ऑकलंड : वृत्तसंस्था : नवनीत कौरच्या दोन गोलच्या जोरावर भारताच्या महिला हॉकी संघाने अखेरच्या पाचव्या लढतीत 3-0 असा विजय मिळवत न्यूझीलंड दौर्याची यशस्वी सांगता केली. भारताने पाच लढतींपैकी तीन सामने जिंकत यश मिळवले. टोकियो ऑलिम्पिकची तयारी म्हणून या दौर्याचे आयोजन करण्यात आले होते.
भारताला या सामन्यात पहिल्या दोन सत्रांत गोल करण्यात अपयश आले होते, पण नवनीतने 45व्या आणि 58व्या मिनिटाला गोल नोंदवले, तर शर्मिलाने 54व्या मिनिटाला गोल केला. भारताने मालिकेत न्यूझीलंड डेव्हलपमेंट संघाविरुद्धची सलामीची लढत 4-0 अशा दणदणीत फरकाने जिंकली होती, पण भारताने न्यूझीलंड वरिष्ठ संघाविरुद्धची दुसरी लढत 1-2 अशी आणि तिसरी लढत 0-1 फरकाने गमावली. भारताला चौथ्या लढतीत ग्रेट ब्रिटनवर 1-0 असा विजय नोंदवला. यानंतर अखेरच्या लढतीत त्यांनी यजमान न्यूझीलंडवर विजय साकारला.
न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या लढतीत तीन गोल करता आले या कामगिरीबद्दल आनंद आहे. नेमक्या कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत याचा अंदाज या दौर्यामुळे आला.-शोएर्ड मरिन, भारताचे प्रशिक्षक