पुण्याजवळील शिरुर तालुक्यात घडलेली स्त्री-अत्याचाराची घटना निव्वळ अंगावर काटा आणणारी नसून अवघ्या महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. अन्य राज्यांतील अशाच स्वरुपाच्या घटनांनंतर तेथील नेतृत्वावर तोंडसुख घेण्यासाठी पुढे सरसावणारे महाराष्ट्रातील सत्ताधारी आता काय बोलणार आहेत? आपल्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का, या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आता त्यांची आहे.
दिवाळीचे दिवस अगदी तोंडावर आलेले असताना अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली जाईल अशी घटना पुण्याजवळील शिरुर तालुक्यात घडली. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे असा उठता-बसता जप करणार्या सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांना यातून नक्कीच चपराक बसली आहे. उत्तर प्रदेशात हाथरस येथे झालेल्या एका युवतीच्या बलात्कार व मृत्यू प्रकरणी देशभर आक्रोश उमटला होता. ते योग्यच होते. उत्तर प्रदेश असो वा राजस्थान, कुठल्याही राज्यात स्त्रियांवरील अत्याचार खपवून घेतले जाता कामा नयेत. परंतु दुर्दैवाने उत्तर प्रदेश व राजस्थानातील घटनांचे यथेच्छ राजकारण करण्यात आले. राजकारणाच्या या चिखलफेकीमध्ये महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांचे नेते आघाडीवर होते. आता त्यांच्याच राज्यात स्त्री-अत्याचाराची लांछनास्पद घटना घडली आहे. पुण्याजवळील शिरुर तालुक्यात न्हावरे गावात एका शेतमजूर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाला. तिने प्रतिकार करताच त्या नराधमाने तिचे डोळेच फोडले व तेथून पोबारा केला. बुधवारी रात्रीच्या सुमारास ही महिला शौचासाठी घराबाहेर गेली होती. तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करणार्या नराधमाने इतक्या जोराचा हल्ला केला की तिचा एक डोळा खोबणीतून बाहेर येऊन धुळीत पडला. तिच्या दुसर्या डोळ्याला देखील गंभीर इजा झाली. त्या दुर्दैवी महिलेस रातोरात पुण्यातील ससून इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले. परंतु तिचे डोळे वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथील महिला अत्याचाराच्या प्रकारानंतर महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षावर भरपूर तोंडसुख घेतले होते. विशेषत: हाथरस येथील दुर्दैवी घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच जबाबदार धरणारी वक्तव्ये केली गेली होती. जणु काही उत्तर प्रदेशात अराजक माजले असून कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने महाराष्ट्रात सारे काही आलबेल आहे, असे राज्य सरकारातील नेत्यांचे वर्तन होते. वास्तविक मुंबई आणि महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे रोजच्या रोज जे धिंडवडे निघत आहेत, ते कोणापासूनच लपलेले नाहीत. काही महिन्यांपूर्वी साधुंना लाठ्याकाठ्यांनी ठेचून मारण्याची विकृत घटना याच महाराष्ट्रात पालघरनजीक घडली होती. मुंबईत देखील परिस्थिती काही वेगळी नाही. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणानंतर मुंबईत पकडण्यात आलेले अमलीपदार्थांचे विक्रेते आणि दलाल यांची संख्या आताच अर्ध्या डझनाच्या वर गेली आहे. कायद्याचा वापर सूड बुद्धीने करून एका नावाजलेल्या पत्रकाराला कसे छळले जाते त्याचे प्रत्यंतर आपण घेतोच आहोत. अशा प्रकारच्या कारभाराला काय म्हणावे? कारभार हाकणार्यांना निव्वळ आपली खुर्ची टिकवण्यात रस आहे असेच चित्र दिसत आले आहे. आता शिरुर येथील घटनेनंतर महाराष्ट्राची होती नव्हती ती अब्रू देखील वेशीला टांगली गेली आहे. या घटनेतून दिसलेले विकृत मानसिकतेचे दर्शन महाराष्ट्राला निश्चितच शोभादायक नाही. ज्या राज्यकर्त्यांना आपल्या आयाबहिणींची अब्रू सांभाळता येत नाही त्यांनी खुर्चीचा हव्यास सोडावा हेच हिताचे.