जसखार, रांजणपाडा, मुळेखंड, सोनारी, करळ गावात घुसले पाणी
उरण ः वार्ताहर – गेल्या सहा दिवसांपासून थैमान घातलेल्या पावसाचा जोर वाढत असून पावसाने आता रौद्ररूप धारण केले आहे. उरणमध्ये गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. उरण तालुक्यात नव्याने येत असलेल्या प्रकल्पांच्या निर्मितीसाठी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचे भराव होत आहेत. त्यावर कोणाचेही निर्बंध नसल्याने मुसळधार पडणार्या पावसाचे पाणी गावागावातील घरांना शिरत आहे.
या शिवाय रस्ते आणि उड्डाणपूल बांधण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी जोरदार पावसामुळे पाणी गटारे नाल्यातुन वाहात गावागावातील नागरिकांच्या घरात घुसत आहे.प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका उरण मधील काही गावांना बसला आहे. दि 1जुलै 2019 रोजी जोरदार पावसामुळे जसखार गावात घरोघरी पाणी शिरले आहे. जवळ जवळ 200 घरात पाणी शिरल्याने घरातील भांडी, फर्निचर,इलेक्ट्रिक वस्तुंचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
प्रशासनाकडून कोणतेही नियोजन वा तातडीची मदत ग्रामस्थांना मिळाली नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पूरामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले असून या घटनेला पूर्णपणे
जेएनपीटी प्रशासन, सिडको प्रशासन, तहसिल कार्यालय, पंचायत समिती, सबंधित ग्रामपंचायत कार्यालयासह आपत्ती व्यवस्थापन समिती सर्वस्वीपणे जबाबदार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. याबाबत नागरीकांनी नुकसान भरपाईची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
दूसरीकडे रांजणपाडा गावातही खूप मोठ्या प्रमाणात घरा – घरात पाणी घुसले होते. प्रशासनाकडे मदत मागूनही वेळेवर मदत मिळाली नाही. शेवटी रांजनपाडा गावचे रमाकांत म्हात्रे यांनी तहसिल कार्यालयात फोन केला, तहसिलदारांना फोन केला तरीही तातडीची मदत मिळाली नाही.शेवटी रमाकांत म्हात्रे यांनी जेएनपीटी प्रशासनाकडे मदत मागितली.
जेएनपीटीचे मदभावे आणि राजेश म्हात्रे यांनी एक पोकलेन मशिन उपलब्ध करून दिली. जासईचे सरपंच संतोष घरत यांनी जेसीबी उपलब्ध करून दिली.त्यामुळे दिवसभर पाण्याचा मार्ग मोकळा
करण्यास मदत झाली.पाणी जाण्याचा दूसरा मार्ग हा बेलपाडा खाडी येथे असून मच्छीमारीसाठी येथील दरवाजे नेहमी बंद केले जातात.
त्यामुळे पाण्याचा हवा तसा निचरा होत नाही.तो दरवाजा उघडल्यास पाण्याचा निचरा होईल व रांजणपाडा गावात घरात पाणी घुसनार नाही. अशी मागणी स्थानिक रहिवाशी
रमाकांत म्हात्रे यांनी तहसिलदार कल्पना गोडे यांच्याकडे केली होती. मात्र या बाबत तहसलदारांनी कोणत्याही प्रकारची तातडीची व्यवस्था केली नाही. रात्री 1 वाजल्या पासून जोरदार पाउस पडत असल्याने घराघरात पाणी शिरले आहे. मुळेखंड गावातही असाच प्रकार घडला असून तेथील जन जीवन विस्कळीत झाला आहे. सिडको ने उन्हाळ्यात मुळेखंड मधील नाले फक्त वरवर साफ केले,पूर्ण काम व्यवस्थित केले नसल्याने हे संकट ओढवले असल्याचे नागरीकांनी सांगितले.
असे प्रकार उरण मधिल अनेक गावात घडून येत असून प्रशासनाकडून कोणतेही तातडीची मदत मिळत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकंदरीतच सिडको,जेएनपीटी, प्रशासन, तहसील कार्यालय,पंचायत समिती, ग्रामपंचायत,आपत्ती व्यवस्थापन समिती या सर्व घटनेला जबाबदार असून या सर्व घटकांकडून नागरीकांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसल्याने येथील आपत्ती व्यवस्थापनाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे.