पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्याला सोमवारी (दि.1) मुसळधार पावसाने झोडपले. मंगळवारी (दि.2) अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे तालुकयातील जनजीवन विस्कळीत झाले. मंगळवारी पहाटे वाकण-पाली-खोपोली महामार्गावरील पाली व जांभुळपाडा पुलावरून पाणी गेले होते. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पाच तास ठप्प झाली होती. सकाळी सव्वा नऊ वाजता पाणी ओसरल्यावर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
सुधागड तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्याने पाली येथे आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. तालुक्यातील सखोल व खोलगट भागात पाणी शिरले आहे. नद्या, नाले, दुथडी भरुन वाहत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा असलेली अनेक झाडे उन्मळून पडत आहेत. पाली बसस्थानकाला पाण्याने वेढा दिला असून, वाहतुकीस अडसर निर्माण झाला आहे.
अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाली व जांभुळपाडा येथील अंबा नदी पुलावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. तहसिलदार दिलीप रायन्नावर व पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापनासह पोलीस प्रशासन दोन्ही पुलांवर ग्रामस्थांना आवश्यक ते सहकार्य करीत होते.
– मुसळधार पावसामुळे पाली व जांभुळपाडा येथील अंबा नदी पुलावरून पाणी गेले. तेथे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. व अधिक सतर्क राहावे.
-दिलीप रायन्नावर, तहसीलदार, पाली-सुधागड