
मुरुड : प्रतिनिधी
नगर परिषदेने मुरुड शहरातील शेगवडा परिसरातील नाल्यावर नियमबाह्य बांधकाम केले असल्याने तेथील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरण्याची शक्यता निर्मााण झाली आहे. स्थानिक रहिवाशांची पर्वा न करता नाल्यावर बांधकाम करून नगर परिषदेने जनभावनेचा अनादर केल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते आण्णा कंधारे यांच्या पुढाकाराने मुरुड शहरात ठिकठिकाणी नगर परिषदेचा निषेध करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. नाल्यावर बांधकाम करुन व नैसर्गिक पाणी वाहून जाण्याचा मार्ग अरुंद करून शहरातील नागरिकांना त्रास देण्याचा नाहक प्रयत्न नगर परिषदेने केला आहे. लोकांच्या घरात पाणी शिरण्यासाठी व मालमत्तेचे नुकसान करण्यासाठी हे नगर परिषदेचे कट कारस्थान असून आम्ही त्याचा निषेध करीत आहोत, अशा आशयाचा मजकूर या बॅनरमध्ये आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवार (दि. 3)पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.