Breaking News

श्वानांनंतर आता माकडांचा उच्छाद

पोलादपुरातील स्थिती; नगर पंचायतीकडून उपाययोजनेची अपेक्षा

पोलादपूर ः प्रतिनिधी

पूर्वी पोलादपूरची ग्रुपग्रामपंचायत असताना गावडुक्करांच्या उपद्रवाने हैराण झालेल्या पोलादपूरकरांना नंतरच्या काही काळात मोकाट कुत्र्यांचा जाच सहन करावा लागत असे. मात्र, पोलादपूर तालुक्यातील रेशनधान्य घोटाळ्याचा एक टेम्पो पोलादपूर तहसिल कार्यालयाच्या दारात उभा राहिल्यानंतर आतील तांदूळ गहू सडल्यामुळे तेथे माकडांचे कळपच्या कळप येऊन सडके तांदूळ गहू खाऊ लागले. ग्रामपंचायत असताना गावडुक्करांचा हैदोस नियंत्रणात आणला गेला पण कुत्र्यांच्या सुळसुळाटावर नगरपंचायत झाल्यानंतर गेल्याच महिन्यात निर्बिजीकरणाद्वारे नियंत्रण आणले गेले. आता कळपाने फिरणार्‍या माकडांची संख्या नियंत्रित करण्यासाठी नगरपंचायत कोणते उपाय करणार, याकडे पोलादपूरकरांचे लक्ष लागले आहे. पोलादपूर तालुक्यात तब्बल 25 वर्षांपूर्वी पोलादपूरची ग्रुपग्रामपंचायत असताना गावडुक्करांनी हैदोस घातला होता. यानंतर पोलादपूर ग्रामपंचायत झाल्यानंतर या गावडुक्करांना पकडून पोलादपूरपासून दूर नेऊन सोडण्याची मोहीम राबविण्यात आली. पोलादपूर ग्रामपंचायत आल्यानंतर मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आणि माकडांच्या कळपांचे आगमन 2003-2004 दरम्यान पोलादपूर तहसिल कार्यालयाच्या पुरवठा विभागाच्या गहू तांदूळ घोटाळयावेळी रेशनधान्यासह टेम्पो पकडण्यात आल्यानंतर सडलेल्या गहू तांदळावर ताव मारण्यासाठी झाले. गेल्या वर्षी एका पिसाळलेल्या कुत्र्याने पोलादपूर शहरामध्ये अनेकांना चावे घेतल्यानंतर कुत्रे घातक वाटू लागले तर माकडही पिसाळून एका महिलेला चावा घेऊन सिध्देश्वर आळी परिसरात दहशत माजवू लागले होते. त्यामुळे प्राधान्याने मोकाट कुत्र्यांची संख्या वाढून श्वानदंशाच्या घटना यंदा वाढू नयेत, यासाठी पोलादपूर नगरपंचायतीने कुत्र्यांची धरपकड सोसायटी ऑफ ऍनिमल प्रोटेक्शन या कोल्हापूर येथील संस्थेच्या सहकार्‍यांमार्फत करण्यात येऊन स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृहात निर्बिजीकरणाची मोहीम राबवत नागरिकांना श्वानदंशापासून दिलासा दिला. यामुळे पोलादपूर शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात येऊन कुत्र्यांच्या आक्रमकतेलादेखील पायबंद बसून श्वानदंश टळणार आहेत.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply