पालिका प्रशासनाकडून स्वच्छता मोहिमेसाठी निधी
खोपोली : प्रतिनिधी – वरची खोपोली येथील विरेश्वर मंडळ व ग्रामस्थांनी शंकर मंदिर परिसरातील विरेश्वर तळ्यातील धोकादायक जलपर्णी व शेवाळ काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. मागील दहा दिवस दररोज एक ट्रॉली या प्रमाणे दहा ट्रॉली शेवाळ व जलपर्णी येथील ग्रामस्थांनी तळ्यातून बाहेर काढली.
वास्तविक हे काम खोपोली नगरपालिकेकडून होणे अपेक्षीत होते. स्वतंत्र आर्थिक तरतूद असूनही नगरपालिकेकडून तलावातील गाळ काढण्याकडे झालेल्या दुर्लक्षाबाबत चौफेर टीका सुरू झाली. त्यानंतर आत्ता नगरपालिकाही या मोहिमेत सहभागी झाली असून, याकरिता आवश्यक यंत्रणेसह नगरपालिकेकडून हे काम करणार्या विरेश्वर ग्रामस्थ मंडळाला एक लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.
मागील महिन्यात विरेश्वर तळ्यात पोहण्यासाठी आलेल्या शहरातील एका तरुणाचा जलपर्णीत अडकून मृत्यू झाला होता. त्यानंतर वरची खोपोली ग्रामस्थ मंडळ व विरेश्वर मंडळाच्या सदस्यांनी तळ्यातील शेवाळ व धोकादायक जलपर्णी काढण्याची मोहीम सुरू केली. या मोहिमेत दर दिवशी एक ट्रॉली या प्रमाणे मागील दहा दिवसात दहा ट्रॉली शेवाळ व जलपर्णी तळ्यातून बाहेर काढण्यात आली आहे. याची दखल घेत स्थानिक नगरसेवक मनेश यादव व माधवी रिठे यांनी खोपोली नगरपालिका प्रशासनाला सदर मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. तलावातून काढलेले शेवाळ व जलपर्णी उचलून योग्य ठिकाणी वाहून नेण्यासाठी नगरपालिकेकडून यंत्रणा देण्यात आली आहे. तसेच विशेष निधीतून एक लाखाचा निधी विरेश्वर ग्रामस्थ मंडळाला देण्याचीही तरतूद केली आहे.