पनवेल : बातमीदार
तालुक्यातील एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 32 वर्षीय पीडित महिला नवबौद्ध असून पनवेल तालुक्यातील एका गावात राहत आहे. 2006 मध्ये तिचे लग्न झाले आहे. अंतरजातीय विवाह केल्यामुळे पीडित महिलेला तिची सासू, दीर, जाऊ, नणंद व नंदावा हे वारंवार त्रास देत होते व तिला जातिवाचक शिवीगाळ करत होते. एकत्र कुटुंबात राहत असलेल्या खोल्या व तळमजल्यावरील स्वयपांक घरात मला प्रवेश करण्यास, तसेच कोणत्याही वस्तूस हात लावण्यास मला वरील लोकांनी बंदी केली होती. जातीवरून शिवीगाळी करून नेहमी त्रास देत होते. माझे पती कामानिमित्त बाहेर गेल्यावर मला हे सर्व जण घरात वावरण्यास देखील मनाई करीत होते. 2019 मध्ये नणंद, मोठा दीर, जाऊ व नंदावा यांनी मारझोड करून घराबाहेर हाकलून दिले. 2006 ते 2019 दरम्यान पीडित महिलेला पाच जणांनी जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली, तसेच मारहाण करून घराबाहेर हाकलून देऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. आरोपींविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैलास सत्तेरे यांच्या वाढदिवसानिमित्त वह्यावाटप
उरण : माणकेश्वर सामाजिक विकास संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष कैलास सत्तेरे यांचा वाढदिवस रानवड शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप करून साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष नितीन पाटील, सरपंच राजेंद्र ठाकूर, बँकेचे मॅनेजर संदीप शेलार, पराग काठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कैलास सत्तेरे यांना वाढदिवसानिमित्त अनेकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.
रोडपालीत ट्रेलरची चोरी
पनवेल : रोडपाली गावाजवळील तलावाजवळ उभ्या करून ठेवलेल्या ट्रेलरची अज्ञातांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. अविनाश गायकवाड यांनी त्यांच्याकडील ट्रेलर क्रं. एमएच-46-एच-2677 हा रोडपाली गावाच्या तलावाजवळ उभा करून ठेवला असता अज्ञात चोरट्यांनी तो ट्रेलर चोरून नेला. याबाबतची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.