महाड : प्रतिनिधी
शिक्षण विभागाच्या वतीने महाडच्या गटशिक्षण अधिकारी अरुणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शेतशिवार उपक्रम सुरू करण्यात आला असून, या उपक्रमातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतात उतरवून भात लावणीचे प्रात्यक्षिक दाखवले. विद्यार्थ्यांनीही आपले कोवळे पाय चिखलात रोवत रिमझिम पावसात भात लावणीचा मनसोक्त आनंद घेतला.
शाळेच्या मध्यान्ह भोजनात भात खिचडी खाणार्या विद्यार्थ्यांना या भातासाठी लागणारा तांदूळ कसा पिकवला जातो, त्यासाठी किती कष्ट करावे लागतात आणि कोकणातील भात लावणी परंपरेची भावी पिढीला माहिती मिळावी म्हणून महाड शिक्षण विभागाच्या वतीने शेतशिवार उपक्रम राबविण्यात येत आहे. सध्या कोकणात भात लावणीची कामे सुरू झाली आहेत. या भात लावणीचा आनंद आणि भात लावणी कशी केली जाते याची भावी पिढीला माहिती व्हावी म्हणून प्राथमिक शाळेतील मुलांना शेतशिवार या उपक्रमांतर्गत भात लावणीचे प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमाला सुरुवात झाली असून तालुक्यातील काही शाळेतील विद्यार्थी भात लावणीसाठी शेतात उतरले आहेत. प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना थेट शाळेच्या जवळच असलेल्या शेतात नेले. त्या ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापिका निलांबरी घोलप आणि इतर शिक्षिका, शिक्षकांनी भात लावणीविषयी माहिती दिली. शेतात तयार झालेल्या चिखलात विद्यार्थ्यांनीदेखील मनसोक्तपणे भात लावणीचा आनंद घेतला. गटशिक्षण अधिकारी अरुणा यादव यादेखील भात लावणी करू लागल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.