Breaking News

गुळसुंदे परिसरातील महिलांचा जि. प.वर हंडा मोर्चा

अलिबाग : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यातील गुळसुंदे परिसरातील महिलांनी सोमवारी (दि. 25) डोक्यावर रिकामे हंडे घेऊन रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील कार्यालयावर मोर्चा काढला. वारंवार पाठपुरावा करूनदेखील पिण्याच्या पाण्यासारख्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या ग्रामस्थांचा संताप अनावर झाल्याचे या वेळी पहावयास मिळाले. गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील लाडीवली, आकुलवाडी, डोंगरीचीवाडी, स्टेशनवाडी, फलाटवाडी या वाड्या वस्त्यांवरील ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी येत नाही. या गावांना गेली अनेक वर्षे नादुरुस्त असलेल्या चावणे प्रादेशिक योजनेद्वारे पाणी पुरवले जाते. पण त्यातून गढूळ पाणी मिळते, तेही अनियमित असते. त्यामुळे येथील ग्रामस्थ त्रस्त असून त्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला, पुरुषांनी सोमवारी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा कार्यालयाला टाळे ठोकण्याच्या इराद्याने धडक दिली.या संदर्भात पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडे वारंवार पाठपुरावा करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष होत आहे. मार्च महिन्यात या महिलांनी याच प्रश्नावर पनवेल पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार केला. पालकमंत्री आदिती तटकरे यांनाही साकडे घातले, मात्र ही समस्या काही मार्गी लागली नाही. त्यानंतर जुलै महिन्यात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी गावात आले. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत चार महिन्यांत पुरेसे आणि शुध्द पाणी देण्याबाबत आश्वासित केले, मात्र आजतागायत त्यासाठी कुठलीच हालचाल झाली नाही. त्यामुळे हे पाऊल उचलावे लागले, असे या आंदोलकांंनी सांगितले. अलिबागेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेला हा हंडा मोर्चा एसटी स्टँडमार्गे टपाल कार्यालयाजवळ आला. तेथे पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. या आंदोलनात आदिवासी महिलांचा मोठा सहभाग होता. या महिलांनी डोक्यावर रिकामे हंडे घेतले होते. शिवाय गढूळ पाण्याचे नमुनेही आणले होते. या वेळी संतोष ठाकूर व मोर्चेकरी उपस्थित होेते. मोर्चेकरी जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देत होते. दरम्यान, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले.

एकतर पुरेसे पाणी मिळत नाही. कधीमधी पाणी येते तेसुद्धा खराब असते. हे अशुद्ध पाणी पिऊन आमची पोरंबाळं आजारी पडताहेत. त्यांना सतत डॉक्टरकडे न्यावं लागतं. रोज पाणी विकत आणून पिणे परवडत नाही. मोर्चे काढले, निवेदने दिली, पण आम्हाला पाणी काही मिळत नाही. आम्ही करायचं तरी काय हा प्रश्न आहे.

-ज्योती पाटील, ग्रामस्थ, गुळसुंदे, ता. पनवेल

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply