नगरपंचायत-पंचायत समितीमध्ये तू तू मैं मैं; वीज-पाणी नसल्याने पालक संतप्त
खोपोली : प्रतिनिधी
नगरपंचायत आणिपंचायत समिती यांच्यातील समन्वयाअभावी खालापुरातील अंगणवाड्यांची दुरवस्था झाली असून, गळणार्या अंगणवाड्यांची दुरूस्ती, वीज आणि पाणी सुविधा पुरवा, असे सांगण्याची वेळ येथे येणार्या मुलांच्या पालकांवर आली आहे.खालापूर नगरपंचायत हद्दीत वाल्मिकवाडी, वनवे, खोडावाडी, शिरवलीवाडी, महड, निंबोडे, खालापूर एक व खालापूर दोन अशा आठ अंगणवाड्या असून एकूण 115 बालके हजेरी पटावर आहेत. खालापूर ग्रामपंचायतीला साडेतीन वर्षापूर्वी नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आणि या अंगणवाड्यांना कोणी वाली उरला नाही. अंगणवाड्यांना सोयीसुविधा कोणी पुरवाव्यात, दुरूस्तीची जबाबदारी कोणाची यावरच घोडे अडले आहे. खालापुरातील या अंगणवाड्यांकडे नगरपंचायत लक्ष देणार कीपंचायत समिती यावर अद्याप एकमत झाले नाही. या तू तू मैं मैंमध्ये सध्या जोरदार पडणार्या पावसात अंगणवाड्यांना गळती लागली आहे. त्यातच कहर म्हणजे आठही अंगणवाड्यांत वीज आणि पाणी यांसारख्या मूलभूत सोयीसुविधादेखील नसल्याने या अंगणवाड्या कोंडवाडा वाटत आहेत. अंगणवाड्या जिल्हा परिषदेची मालमत्ता असल्याने नगरपंचायत निधी देण्यात अडसर येत असल्याचे नगरपंचायतीकङून सांगण्यात येत आहे. नगरपंचायत हद्द असल्याने निधी मिळण्यास अडचण येत असल्याचे कारण पंचायत समितीकडून पुढे करण्यात येत आहे. नियमाच्या या दुष्टचक्रात अंगणवाडीसेविका, मदतनीसांची फरफट तर होत आहेच, शिवाय या अंगणवाड्यांत मुलांना पाठविण्यास पालकदेखील नाखूश असून परिस्थिती बदलली नाही, तर मुलांना या अंगणवाड्यांत न पाठवण्याचा निर्धार पालकांनी केला आहे.आवश्यक सोयीसुविधा मिळत नसल्याने येथील अंगणवाडीसेविकांची ओढाताण होत असून, त्यांना दबावाखाली काम करावे लागत आहे.