Breaking News

पेण मतदारसंघाचा अंतिम निर्णय युतीचे नेते घेतील -विष्णू पाटील

नागोठणे : प्रतिनिधी

भाजपची सदस्य नोंदणी तसेच नवीन मतदारांची नोंदणी करणे हा उद्देश ठेवून या संदर्भात रोहे तालुक्यातील पाच पंचायत समितीच्या गणातील भाजपच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची बैठक नागोठण्यात घेण्यात आली होती. आपल्या पेण विधानसभा मतदारसंघात शिवसेना तसेच भाजप या दोन्ही पक्षांचे उमेदवार उत्सुक आहेत. मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हेच घेणार असून त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा पेण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष विष्णू पाटील यांनी केले.

पेण तालुक्यातील पाच पं. स. गणातील भाजप कार्यकर्त्यांची सभा बुधवारी सायंकाळी येथील टीएसके हॉलमध्ये घेण्यात आली. त्यावेळी सभेत झालेल्या चर्चेची माहिती पाटील यांनी पत्रकारांना  दिली. यावेळी भाजपचे रोहे तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर, तालुका संपर्कप्रमुख राजेश मपारा, सुधागड तालुकाध्यक्ष राजेंद्र राऊत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग, तालुका सरचिटणीस आनंद लाड, संजय लोटणकर आदी उपस्थित होते. भाजप, शिवसेनेसह इतर तीन पक्षांची आमची महायुती येणार्‍या विधानसभा निवडणुकीत कायम राहणार आहे. मतदार सतर्क राहण्यासाठी प्रत्येक गावागावांमध्ये जाऊन नागरिकांशी संपर्क साधावा अशी सूचना देण्यात आली आहे. युतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येण्यासाठी दिवसरात्र एक करून काम करावे, असा आमचा उद्देश आहे, असे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. 2014 च्या निवडणुकीतील सेनेचे उमेदवार पुन्हा उभे राहण्यासाठी आग्रही आहेत, या बाबत पाटील यांना विचारले असता, भाजपकडून माजी मंत्री रविशेठ पाटील आणि मी स्वतः सुद्धा आशावादी आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी द्यायची याचा निर्णय युतीचे ज्येष्ठ नेतेच घेणार असल्याने कोणाच्या प्रारब्धात काय आहे हे देवालाच माहीत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मराठा आरक्षण, शेतकरी सन्मान योजना आणि संजय गांधी निराधार योजना यशस्वीपणे राबविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच त्यांच्या मंत्रिमंडळाच्या अभिनंदनाचा ठराव या सभेत मंजूर करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्रात पुन्हा सरकार आणण्यासाठी पेण मतदारसंघातील भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आजपासून कामाला लागले असल्याचे विष्णू पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply