Breaking News

‘कांगारूं’ना नमवून यजमान फायनलमध्ये ; दुसर्या उपांत्य सामन्यात इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर मात

बर्मिंगहम : वृत्तसंस्था

विश्वचषक उपांत्य फेरीच्या दुसर्‍या सामन्यात यजमान इंग्लंडने पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियावर आठ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळविला. अंतिम फेरीत इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन संघांमध्ये रविवारी (दि. 14) अंतिम सामना रंगणार आहे.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 224 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या जेसन रॉय आणि जॉनी बेअसस्टोव यांनी 124 धावांची दमदार सलामी दिली. बेअसस्टोव 34 धावांवर बाद झाला. रॉय अधिक आक्रमक खेळत होता, पण सदोष पंचगिरीचा फटका त्याला बसला. त्याने 65 चेंडूंत 9 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 85 धावांची खेळी साकारली. तो बाद झाल्यावर जो रुट आणि इऑन मॉर्गन यांनी अर्धशतकी भागीदारी

रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, स्टीव्ह स्मिथच्या 85 धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 223 धावा करता आल्या. स्मिथला यष्टीरक्षक कॅरीची चांगली साथ मिळाली. कॅरीने जबड्याला दुखापत होऊनही 46 धावांची खेळी साकारली. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. अ‍ॅरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर आणि नव्याने ताफ्यात दाखल झालेला पिटर हँड्सकोम्ब यांना इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर अपयश आले. ख्रिस वोक्स आणि जोफ्रा आर्चर यांनी ऑसींना धक्के देत त्यांची अवस्था 3 बाद 14 अशी केली. त्यानंतर स्मिथ आणि केरी यांनी डाव सावरला.

– क्रिकेटला मिळणार नवा विश्वविजेता

क्रीडाजगताला यंदा नवीन विश्वविजेता मिळणार आहे. यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक पाचवेळा विश्वचषकावर नाव कोरले आहे. त्याखालोखाल भारत आणि वेस्ट इंडिज यांनी दोनदा; तर पाकिस्तान, श्रीलंका यांनी प्रत्येकी एकदा हा चषक जिंकला आहे.

– ऑस्ट्रेलियाची विजयी मालिका खंडित

विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच पराभव आहे. या वर्षी ऑस्ट्रेलिया संघ तब्बल आठव्यांदा उपांत्य फेरीत पोहोचला होता. विशेष म्हणजे यापूर्वीच्या सातही वेळेस त्यांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करीत अंतिम फेरी गाठली होती. यंदा मात्र इंग्लंडने त्यांची ही विजयी घोडदौड रोखली.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply