पनवेल : वार्ताहर
सडक सुरक्षा जीवन रक्षा हे ब्रीदवाक्य घेवून महामार्ग पोलीस मदत केंद्र पळस्पे यांच्या वतीने 32वे रस्ते सुरक्षा अभियान 2021चे आयोजन करण्यात आले होते. हे अभियान 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी या कालावधीत राबविले जाणार आहे. या कार्यक्रमाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.
या वेळी महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे कोरोना वॉरीयर्स अंमलदार अपघातग्रस्तांना मदत करणारे सामाजिक संस्थेचे सदस्य, देवदुत कर्मचारी, आय. आर. बी. कर्मचारी तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलचे कर्मचारी यांचा या वेळी शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, रायगड विभागाचे पोलीस उप अधीक्षक संदीप भागडीकर, महामार्ग पोलीस रायगड विभागाचे पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर, जनता विदयालय आजिवलीचे प्राचार्य, शिक्षक वृंद व विद्यार्थी तसेच नवकार लॉजीस्टीकचे वाहनचालक तसेच महाराष्ट्र वाहतुक सेनेचे पदाधिकारी, परिसरातील ग्रामस्थ मंडळी, अपघातग्रस्ताांसाठी मदत करणारी संघटना तसेच देवदुत टिम आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी केले. मान्यवरांचे आभार पनवेल विभागाचे महामार्ग पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर यांनी मानले व सुत्रसंचलन भिंगार शाळेचे शिक्षक तानाजी भोसले यांनी केले.
रसायनीतील बाइक रॅलीला प्रतिसाद
मोहोपाडा : प्रतिनिधी
32वे रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा वाहतूक निरीक्षक रविंद्र शिंदे, रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पाताळगंगा परिसरात रसायनी वाहतूक शाखेचे संदीप पाटील, राकेश म्हात्रे व रायसिंग वसावे यांनी रस्ते सुरक्षा अभियान राबविले. याकरिता रस्ते सुरक्षा संबंधी एमआयडीसी ते चांभार्ली अशी जनजागृती बाइक रॅली काढण्यात आली.
या रॅलीत ईदिमुस्सु कंपनीच्या 50 बाईक व पाच चारचाकींचा समावेश होता. या रॅलीत रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक सुजाता तानवडे, निवृत्त निरीक्षक गोर्हे, मंगेश लांगी, ईदिमुस्सू कंपनीकडून मॅनेजर अनिल घेवारी, असिस्टंट मॅनेजर स्वप्निला आंबेकर, कंपनी सुरक्षा अधिकारी भूषण दामले व इतर पोलीस कर्मचारी, रिक्षाचालक सहभागी झाले होते. या वेळी रस्ते सुरक्षा अभियानाचे बॅनर लावून चौका चौकात रस्ता सुरक्षा संबंधी मार्गदर्शन करण्यात आले.
वन डे विथ पोलीस उपक्रमाचे उद्घाटन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत, वाहतुक विभागाकडुन रस्ता सुरक्षा अभियान2021 अंतर्गत वन डे विथ पोलीस या उपक्रमाचा शुक्रवारी (दि. 22) छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी, नवी मुंबई या ठिकाणी उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता.
वन डे विथ पोलीस या उपक्रमाचे उद्घाटन सुप्रसिध्द गायक, पद्मश्री शंकर महादेवन यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, सह आयुक्त डॉ. जय जाधव, परिमंडळ-1 चे उप आयुक्त सुरेश मेंगडे, वाहतुक उप आयुक्त पुरुषोत्तम कराड, वाशी वाहतुक विभाग सहायक आयुक्त अरुण पाटील, पनवेल वाहतुक विभाग सहायक आयुक्त भागवत सोनवणे, वाशी विभाग सहायक आयुक्त विनायक वस्त, वाहतुक विभागातील सर्व युनिट प्रभारी अधिकारी व वाहतुक पोलीस अंमलदार तसेच नागरीक उपस्थित होते.
या उपक्रमामध्ये जनतेला सहभागी करुन घेवुन रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने वाहतुक नियम पालन करावे यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. हे अभियान पुढील एक महिना चालु राहिल. त्याकरीता नवी मुंबईतील 31 चौकामध्ये सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत जवळच्या सिग्नलवर वाहतुक पोलीसांसमवेत सिग्नलचे आजुबाजूचे सोसायटीतील नागरीक सहभागी होवुन वाहतुक नियमन करतील.
गायक शंकर महादेवन यांनी नवी मुंबईतील जनतेला या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करून या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.