मोहोपाडा : रामप्रहर वृत्त
गेले काही दिवस पावसाचे अगमन मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतीची कामे पूर्णपणे खोळंबली होती, मात्र पाऊस क्षणभर विश्रांती घेत असल्यामुळे आता बळीराजा लावणीत गुंतला असून गीत गात शेतातील कामे करीत आहे. सध्या पाऊस येत असून आणि लगेच जात असल्याने या वेळेत शेतीची कामे करण्यास शेतकर्यांची लगबग सुरू झाली आहे. यामुळे ग्रामीण भागात अग्रेसर असलेले लाकडी नांगर घेऊन शेतात काम करीत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. खांद्यावर चाबूक, खिल्लारी सर्जा-राजांची डौलदार बैलजोडी अन् औतावरील मधूर गाण्यांच्या आरोळीने रानोमाळ गरजू लागल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.
पावसाचे आगमन होत नाही या भीतीने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते, परंतु पावसाने आपले रौद्ररूप प्रकट करून शेतकर्याला दिलासा दिला. पावसाच्या भरोशावर शेतकर्यांनी पेरणी केली होती, परंतु जंगलातील पक्षी हे धान्य आपले अन्न म्हणून उपयोगात आणत होते. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता, परंतु गेल्या काही दिवसापासून पावसाचे आगमन होत असल्याने शेतकर्याला मोठा दिलासा मिळाला आहे आणि ग्रामीण भागातील शेतकरी शेतीच्या मशागतीसह लावणीत पुन्हा एकदा जोमाने सज्ज झाला. यामुळे खरीप पिकांच्या पूर्व मशागतीच्या कामांची धांदल उडाली आहे. सकाळ-सायंकाळ हा परिसर बळीराजाच्या औताच्या गीतांच्या मैफलीने रंगून जात आहे.
औतावरील गीतांच्या मधूर मैफलीमध्ये सर्जा-राजाच्या नावानं गीत गाणे, ओव्या गाणे, बैलांना हाक देणे आसल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. यामुळे शेतीच्या कामाला वेग आलाय हे निश्चित. ग्रामीण भागात पूर्वी गावोगावी आढळणारे जनावरांचे कळप आता कमी होत असल्याने पाळीव जनावरांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यातच सतत जनावरांचा चारा व पाण्याची समस्या गंभीर बनत असल्याने जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा सध्या संकटात सापडला आहे. पूर्वी शेतीच्या मशागतीसाठी बैलाचा वापर करत. आजही होत आहे मात्र मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत नाही. शेतकर्यांचा मित्र म्हणून बैलाची ओळख ग्रामीण भागामध्ये निर्माण झाली होती. त्या बैलांना जन्म देणारी गोमाता म्हणून ओळखले जाते, मात्र विज्ञानाच्या प्रगतीमुळे शेतकरी आता यांत्रिकीकरणाकडे वळून अत्याधुनिक पद्धतीने शेती करीत आहे. त्यातच औताच्या सहाय्याने शेती करण्यासाठी व बैलाद्वारे शेतीची मशागत करण्यासाठी सालगडीही मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे औताने शेती करणे शेतकर्यांना परवडत नाही. ज्याच्याकडे जितके औत तितका शेतीचा दर्जा मोठा असा फार पूर्वी शेतकर्यांचा समज होता, परंतु आता यांत्रिकीकरणाच्या युगामध्ये बैलाची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे व ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतातील नांगरणी, उखलन, पेरणी इत्यादी कामे केली जातात. यांत्रिकीकरणाच्या जमान्यामध्ये शेतकरी अत्याधुनिक यंत्राकडे वळाला असून नवनवीन टेक्नॉलॉजी वापरून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्याकडे शेतकर्यांचा कल वाढला असल्यामुळे बैलाद्वारे करण्यात येणारी मशागत इतिहासजमा होत आहे.