Breaking News

कोन-सावळे रस्ता पूर्ण झाल्यावर नागरिकांचा प्रवास होणार सुकर

  • आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन
  • काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोन-सावळे रस्ता पूर्ण झाल्यावर परिसरातील नागरिकांचा प्रवास सुकर होणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोन-सावळे रस्ता काँक्रिटीकरण कामाच्या भूमिपूजनाच्या वेळी केले.
उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नाने केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत कोन-सावळे रस्ता काँक्रिटीकरणासाठी 20 कोटी रुपये मंजूर झाले असून या कामाचा शुभारंभ शनिवारी (दि. 1) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. सोमाटणे पेट्रोल पंप या ठिकाणी हा सोहळा झाला.
आमदार प्रशांत ठाकूर या वेळी म्हणाले की, अनेक वर्षांपासून उरण विधानसभा मतदारसंघात येणारा कोन-सावळे रस्ता अत्यंत खराब असल्याने रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
आमदार महेश बालदी यांना राज्य सरकार याकडे लक्ष देणार नाही हे माहीत होते. त्यामुळे त्यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार या रस्त्याचा विकास केंद्रीय रस्ते विकास निधीतून होणार आहे.
आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, कोन-सावळे रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी केंद्र सरकारकडून 20 कोटी रुपये मंजूर करून घेऊन आमदार महेश बालदी यांनी चालक आणि प्रवाशांना नववर्षाची सुखद भेट दिली आहे, असे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी सांगितले. यासोबतच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
भूमिपूजन सोहळ्याच्या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक बबन मुकादम, पनवेल पंचायत समितीचे उपसभापती वसंत काठावले, भाजप तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भाताण ग्रामपंचायतीचे सरपंच सुभाष भोईर, उपसरपंच केशव गायकर, तुराडे सरपंच चंद्रकांत भोईर, गुळसुंदे सरपंच हरेश बोंडे, कोन सरपंच निलेश म्हात्रे, सावळे सरपंच प्रफुल्ल माळी, पळस्पे उपसरपंच विजय गवंडी, कसळखंडचे उपसरपंच महेंद्र गोजे, माजी सरपंच अनिल पाटील, तसेच सुनील माळी, वासांबे जि. प. अध्यक्ष सचिन तांडेल, सरचिटणीस प्रवीण जांभळे, किरण माळी, प्रिया मुकादम, अविनाश गाताडे, प्रवीण ठाकूर, प्रवीण खंडागळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply