कर्जत येथील महिला मेळाव्यात अश्विनी पाटील यांचे आवाहन
कर्जत : बातमीदार
पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने केलेल्या कामांची माहिती द्यावी आणि महिलांना आपलेसे करावे, असे आवाहन भाजप कर्जत विधानसभा मतदारसंघ संयोजिका अश्विनी पाटील यांनी कर्जत येथे केले. कर्जत विधानसभा मतदारसंघातील भाजप महिला मोर्चा पदाधिकार्यांची बैठक कर्जत येथील पक्ष कार्यालयातील प्रेरणा सभागृहात झाली. त्यावेळी अश्विनी पाटील उपस्थित महिला पदाधिकार्यांना मार्गदर्शन करीत होत्या. भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष मृणाल खेडकर, जिल्हा सरचिटणीस आजया जखोटिया, जिल्हा चिटणीस स्नेहल सावंत, कर्जत तालुका अध्यक्षा सुनंदा भोसले, शहर अध्यक्षा स्नेहा गोगटे, विधानसभा मतदारसंघ सहसंयोजिका सरस्वती चौधरी, कर्जत तालुका उपाध्यक्षा वर्षा बोराडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या. महिला कार्यकर्त्यांची फळी अधिक सक्षम बनविण्यासाठी आपल्या पक्षाच्या विचाराचे कार्यकर्ते जोडले पाहिजेत आणि नवीन कार्यकर्त्यांना प्रवेश देऊन त्यांना आपल्यात सामावून घेतले पाहिजे. महिलांनी पक्षाची भूमिका समजून सांगण्यासाठी जे साहित्य लागेल ते आपण पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी चर्चा करून उपलब्ध करून घेऊ, असे आश्वासन अश्विनी पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिले.
भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस आजया जखोटिया यांनी संघटनात्मक बाबींवर तर गायत्री परांजपे यांनी सोशल मिडिया या विषयावर यावेळी मार्गदर्शन केले. भाजपा कर्जत तालुका युवती प्रमुखपदी तृप्ती पाटील यांची यावेळी नेमणूक करण्यात आली. तर सुरेखा हिरवे, कल्पना गणात्रा, अलका गुजराथी, अक्षता पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांचे अश्विनी पाटील यांनी स्वागत केले. सुगंधा भोसले यांनी आभार मानले.