पनवेल : बातमीदार
ठाकरे सरकारतर्फे 10 रुपयांत मिळणार्या शिवभोजनाचा शुभारंभ 26 जानेवारी रोजी राज्यभर करण्यात आला. पनवेल तालुक्यात दोन ठिकाणी ही थाळी सुरू करण्यात आली आहे. पनवेल आणि कळंबोली येथे शिवभोजन केंद्र उभारण्यात आली आहेत, मात्र ही केंद्र सार्वजनिक ठिकाणांपासून दूर आहेत. नव्या सरकारने शिवभोजन योजना जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी आणि महापालिका क्षेत्रात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही थाळी रायगड जिल्ह्यातील अलिबागसह पनवेलमध्ये देण्याचे ठरले. पनवेल शहरात टपाल नाक्याजवळ न्यू संतोषी स्वीट आणि हॉटेल या ठिकाणी शिवभोजनाचा शुभारंभ रविवारी प्रजासत्ताक दिनाला करण्यात आला, तर कळंबोली सेक्टर 3 येथील केएलई कॉलेजसमोर सप्तश्रुंगी स्वयम् सहाय्यता महिला मंडळाला शिवभोजनाचे कंत्राट देण्यात आले आहे. तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून ठिकाणांची निवड करण्यात आली होती. पनवेलमध्ये अनेकांकडून अर्ज आले होते, मात्र या दोन ठिकाणांना मंजुरी देण्यात आली. वास्तविक गरीब गरजूंना उपाहार मिळावा म्हणून जिल्हा रुग्णालये, बस स्थानक, रेल्वे परिसर, बाजारपेठ, शासकीय कार्यालय परिसर, बाजारपेठ आदी ठिकाणी शिवभोजन देण्यात यावे, असे नमूद करण्यात आले आहे. पनवेल तालुक्यात दिलेली दोन्ही ठिकाणे संबंधित ठिकाणी नाहीत. कळंबोलीत लोकवस्तीत एका कॉलेजसमोर शिवभोजन सुरू करण्यात आले आहे, तर दुसरे ठिकाण पनवेल शहरात टपाल नाका येथे बाजाराची गर्दी नसलेले आहे. त्यामुळे सरकारला सर्वसामान्यांना नक्की जेवण द्यायचे आहे की त्यांना त्यापासून वंचित ठेवायचे, असा सवाल केला जात आहे.