लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे गौरवोद्गार; वर्धापन दिन उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त
सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ ही संस्था पनवेल परिसरात करत असलेले काम प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काढले. सिंधुदुर्ग संघाच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला त्यांनी भेट दिली. त्या वेळी ते उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते.
ही संस्था एकमेका सहाय्य करू या न्यायाने कार्यरत असून एकमेकांच्या सुखदुःखात आणि सेवाकार्यात सदैव सहभागी होत असते. त्यामुळे सुखाचा भाग त्यांच्या वाट्याला जास्त येतोय ही आनंदाची गोष्ट आहे, असे सांगून या संस्थेशी आपले अनेक वर्षांचे ऋणानुबंध जुळून आले असल्याचे लोकनेते ठाकूर यांनी सांगितले.
वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायण पूजा झाली. या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच कोकण रेल्वेत कार्यरत असलेल्या सानिया मोचेमाडकर यांना विशेष कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. हरिश्चंद्रबुवा पालव, प्रभाकरबुवा येरम यांचे भजन व काही बाल कलाकारांचे गायन वादन आदी कार्यक्रम झाले. त्यांना रंगनाथ नेरुरकर, योगेश देसाई, संकेत पवार यांनी मृदुंगसाथ केली.
दरम्यान, या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर आदी मान्यवरांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंधुदुर्ग संघाचे अध्यक्ष केशव राणे, उपाध्यक्ष संतोष चव्हाण, प्रिया खोबरेकर, दीपक तावडे, रामकृष्ण परब, मनोहर मराळ, बाबू दळवी, वासुदेव सावंत, प्रदीप रावले, बाबाजी नेरुरकर, अशोक चव्हाण, किशोर सावंत, प्रिता भोजने, सुरेखा पवार, प्रसन्नकुमार घागरे, दिनकर पेडणेकर, बाळाजी रावराणे, अनिल नेमळेकर यांच्यासह सर्व सदस्यांनी योगदान दिले.