पेण ः प्रतिनिधी
गुजरात-दहेज ते नागोठणे अशा होणार्या रिलायन्स गॅस पाइपलाइनमध्ये पेण तालुक्यातील अनेक शेतकर्यांची फसवणूक झाली असल्याने या शेतकर्यांना योग्य मोबदला मिळून त्यांना नुकसानभरपाई मिळावी याकरिता येत्या 30 जुलैला मुंबई आझाद मैदान येथे आंदोलनसम्राट तथा भाजपचे विधानसभा अध्यक्ष विष्णू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पग्रस्त शेतकर्यांचे धरणे आंदोलन होणार आहे. आंदोलनसम्राट विष्णू पाटील यांनी पुन्हा एकदा करो या मरोची भूमिका घेतली आहे. पेण तालुक्यात प्रकल्पग्रस्त शेतकर्यांची पेण सावरसई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आंदोलनसम्राट विष्णू पाटील म्हणाले की, रिलायन्स गॅस पाइपलाइनमध्ये पेण तालुक्यातील अनेक शेतकर्यांच्या जमिनी गेल्या असल्याने काही शेतकर्यांना चांगल्या प्रकारचा मोबदला देण्यात आला असला तरी मात्र काही शेतकर्यांची फसवणूक करण्यात आली आहे. या शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळावी याकरिता मागील आठ महिन्यांपासून अनेक आंदोलने करण्यात आली, मात्र या आंदोलनांकडे शासनाने कानाडोळा केला असून संबंधित अधिकारी शेतकर्यांची दिशाभूल करीत असल्याने आता करो या मरोची भूमिका घेऊन शेतकर्यांना योग्य मोबदला व नुकसानभरपाई मिळत नाही, तोपर्यंत शेतकर्यांच्या समवेत मुंबई आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे विष्णू पाटील यांनी सांगितले.