Breaking News

साळाव पुलावरील खड्डा वाहतुकीस अडथळा

रेवदंडा ः प्रतिनिधी

साळाव पुलावर पडलेल्या भल्यामोठ्या खड्ड्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून या खड्ड्यामुळे भविष्यात भीषण अपघातास सामोरे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुरूड-अलिबाग तालुक्यांना जोडणार्‍या साळाव पुलावर सातत्याने वाहनांची वर्दळ सुरू असते. मुरूड तालुक्यात पर्यटनासाठी अनेक पर्यटक येतात. त्यामुळे दिवसेंदिवस येथून जा-ये करणार्‍या वाहनांची संख्या अधिक असते. साळाव पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहेत. काही ठिकाणी हे खड्डे फारच मोठे असून निश्चितच या खड्ड्यांमुळे भविष्यात मोठा अपघात घडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. साळाव पुलाच्या दोन खांबांमध्ये काही अंतर आहे. यामध्ये  खडी व डांबर टाकून वाहतुकीसाठी पूल सुरळीत करण्यात आला आहे, परंतु या दोन खांबांमधील अंतरातील डांबर व खडी निघून गेली असून पुलावर खोलगट भाग तयार झाले असून मोठे खड्डे तयार झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने साळाव पुलाच्या डागडुजीकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. तसेच साळाव पुलावरील दोन्ही बाजूचे कठडे काही ठिकाणी मोडकळीस आले आहेत. त्यांची दुरूस्तीसुध्दा करणे आवश्यक आहे. साळाव पुलाच्या निर्मितीनंतर अनेक वर्षे लोटली परंतु या पुलावर पथदिव्यांची सोय करण्यात आली नाही. त्यामुळे रात्री-अपरात्री येथून प्रवास करणे धोकादायक वाटते. काही दिवसांपूर्वीच साळाव पुलावरील अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. भविष्यात साळाव पुलाला पर्यायी पुलाची व्यवस्था शासनाने लवकरच करावी, अशी मागणी स्थानिक स्तरावरून केली जात आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply