Breaking News

संक्रमण आणि दिलासा

कोरोनाने आपला विळखा भारतातही घालायला सुरुवात केली आहे. कोविड-19चे नवे रुग्ण दररोज देशभरात आढळत असून, मृतांचा आकडाही हळुहळू पुढे सरकत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव देशात होत असताना या महाभयंकर आजारातून बचावणारेही आहेत. ही दिलासादायक बाब म्हटली पाहिजे. कोरोनावर मात करायची असेल, तर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

संसर्गजन्य रोग कोरोनाने जगातील बहुतांश देशांना आपल्या कवेत घेतले आहे. मोठ-मोठे देश अचानक आलेल्या या संकटापुढे हतबल झालेले दिसून येते. आपल्या भारतातही कोरोनाने हातपाय पसरले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. हा आकडा इतर देशांच्या तुलनेत मोठा नसला तरी नव्या रुग्णांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. ते पाहता लोकांनी शासनाला सहकार्य करून स्वत:च आपला जीव वाचवला पाहिजे. जीवनावश्यक व अत्यावश्यक बाब आठवड्यातून एखाद-दुसर्‍यांदा असू शकते. त्यासाठी एकच व्यक्ती घराबाहेर पडली पाहिजे. शिवाय त्याने सुरक्षित अंतर राखले पाहिजे. काही ना काही कारण काढून वारंवार घराबाहेर पडणे म्हणजे कोरोनाला निमंत्रण देण्यासारखे आहे. सुदैवाने आपल्या देशाला नरेंद्र मोदीरूपी सक्षम व कणखर नेतृत्व लाभले आहे. आपल्या देशाची स्थिती आज इतर देशांसारखी बिकट नाही याचे श्रेय पंतप्रधान मोदींची दूरदृष्टी, नियोजन, धडक निर्णय व उपाययोजना याला जाते. सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेश पंतप्रधानांचे मार्गदर्शन आणि सूचनांचे पालन करीत आहेत. या आपत्तीमध्ये दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाचे नवे रुग्ण समोर येत असताना या रोगाची लागण झालेले काही जण यशस्वीपणे उपचार घेऊन बरे होत आहेत. कोरोनावर अद्याप लस अथवा औषध आलेले नसले तरी रोगप्रतिकारक शक्ती वाढवून विषाणू मारण्यासाठी काही गोळ्या-औषधे उपयुक्त ठरत आहेत. त्या दृष्टीने वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस झटत आहेत. रस्त्यावर पोलीस लढा देत असून, प्रशासकीय पातळीवर संबंधित यंत्रणा कार्यरत आहे. अशा प्रकारे व्यवस्थेतील सारे घटक आपापली जबाबदारी चोख बजावून कार्यरत आहेत. या सार्‍याचे फलित म्हणजे रुग्ण ठीक होऊन आपल्या घरी परतत आहेत. आणखी काही दिवस नियोजित लॉकडाऊन असणार आहे. त्यात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. याचे कारण जोपर्यंत कोरोनाचे संक्रमण थांबत नाही, तोपर्यंत धोका पत्करणे उचित ठरणार नाही. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून, राज्यात सर्वात जास्त रुग्णांची नोंद ही मुंबईत झालेली आहे. मुंबापुरीत परिस्थिती चिंताजनक आहे. गंभीर बाब म्हणजे दैनंदिन कामासाठी मुंबईत ये-जा करणार्‍यांमुळे शेजारील जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा फैलाव होत असल्याचे दिसून आले आहे. रायगड जिल्ह्यात असे अनेक रुग्ण आढळले ज्यांचे अत्यावश्यक सेवा म्हणून नित्य मुंबईला जाणे आहे. यावर राज्य सरकारने काही तरी उपाय शोधला पाहिजे. मुख्य म्हणजे अत्यावश्यक सेवा देणारे या महामारीने ग्रासले जाऊ नये याकरिता ठोस पाऊल उचलले पाहिजे. अधिकाधिक चाचण्या करायला हव्यात. दाट लोकवस्तीच्या वसाहती, झोपडपट्ट्यांमध्ये विशेष लक्ष देणे जरुरीचे बनले आहे. तेव्हाच ही साथ आटोक्यात येण्यास मदत होईल. दुसरे म्हणजे कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकायचे असेल तर सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्या घरी राहून स्वत:सह कुटुंबीयांचा जीव वाचविण्यासाठी धीर आणि संयम धरणे अनिवार्य आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply