उरण : प्रतिनिधी
वर्षासहलीचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या युवकाचा चिरनेर येथील अक्कादेवी धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 21) घडली. प्रणित प्रभाकर ठाकूर (वय 16, रा. जिते, ता. पेण) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
प्रणित हा आपल्या मित्रांसह चिरनेर येथील अक्कादेवी धरणावर पावसाळी सहलीसाठी आला होता. मौजमजा करीत असताना प्रणित पोहण्यासाठी मित्रांसोबत पाण्यात उतरला, मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. तेथे उपस्थित इतर तरुणांनी त्याचा शोध घेऊन त्याला पाण्याबाहेर काढले. त्याच्यावर प्रथमोपचार करून त्याला आधी जासई येथे व नंतर नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आले. चिरनेर येथील अक्कादेवी धरण हे कोणतेही निर्बंध नसल्याने धोकादायक बनत चालले आहे. प्रणित हा कासारभाट येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दहावीमध्ये शिकत होता. त्याच्या आकस्मिक निधनाने जिते गावावर शोककळा पसरली आहे.