Breaking News

माथेरानमध्ये श्रमदानातून रस्त्याला बांध; पर्यावरण संवेदनशील नागरिक संघाचा पुढाकार

कर्जत : बातमीदार

माथेरानला मुसळधार पडणार्‍या पावसामुळे रस्त्यावर जागोजागी पडलेल्या चरांमुळे पर्यटकांसह नागरिकांना चालणे कठीण झाले होते. याबाबत वारंवार तक्रारी करूनसुद्धा नगरपालिका उदासीन असल्यामुळे येथील पर्यावरण संवेदनशील नागरिक संघाने श्रमदान करून रस्त्याच्या कडेला बांध घातला. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा रस्त्यातून न होता तो गटारामधून होणार आहे.

माथेरानमध्ये आल्यानंतर पर्यटक एको पॉइंट आणि शारलोट लेक या दोन्ही पॉइंटला आवर्जून भेट देतात. त्यामुळे हे पॉइंट महत्त्वाचे मानले जातात. या पावसाळ्यात येथील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली होती. घोडेवाले, हातरिक्षावाले यांना प्रवाशांना घेऊन जाताना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत नगरपालिकेत वारंवार तक्रारीदेखील दाखल केल्या, पण नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नाईलाजास्तव पर्यावरण संवेदनशील नागरिक संघाने एको पॉइंट ते शारलोट लेक याकडे जाणार्‍या रस्त्यावर श्रमदानाला सुरुवात केली. संवेदनशील नागरिक संघाचे अध्यक्ष मनोज खेडकर यांच्या पुढाकाराने सकाळी 11 वाजता श्रमदानाला सुरुवात झाली. नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, नगरसेवक शकील पटेल, नरेश काळे यांनी या श्रमदानास हजेरी लावली होती. या श्रमदानात कोकणवासीय समाजाचे उपाध्यक्ष केतन रामाणे, धनगर समाज अध्यक्ष राकेश कोकळे, अश्वपाल संघटनेचे ज्येष्ठ सदस्य अरविंद रांजाणे, व्यापारी मंडळाचे माजी सचिव गिरीश पवार यांच्यासह तरुण मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.

-नगरपालिकेने या रस्त्यावर बांध टाकले नाहीत. त्यामुळे पावसाने जमिनीची धूप होऊन या रस्त्यांना चर पडले. पर्यटकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही श्रमदानातून बांध घालून चर पडलेल्या भागाची लेव्हल करून रस्ता चालण्यायोग्य करीत आहोत.

-मनोज खेडकर, अध्यक्ष,

संवेदनशील नागरिक संघ, माथेरान.

-या रस्त्यांच्या कामाची निविदा काढून त्याची वर्क ऑर्डरसुद्धा देण्यात आली आहे. जुलै महिन्यात पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो म्हणून आम्ही या रस्त्यांची कामे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू करणार आहोत.

-प्रेरणा सावंत, नगराध्यक्षा

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply