बर्मिगहॅम : प्रतिनिधी
जवळपास दीड वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार्या स्टीव्ह स्मिथने इंग्लंडच्या वेगवान मार्याचा आणि चाहत्यांच्या टोमण्यांचा सक्षमपणे मुकाबला करून अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात झुंजार शतक साकारले. त्यामुळे सुरुवातीला स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीसमोर ढेपाळणार्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 284 धावांपर्यंत मजल मारली.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु ब्रॉडने सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (2) आणि कॅमेरून बँक्राफ्ट (8) यांना माघारी पाठवून ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय चुकीचा ठरवला. तिसर्या क्रमांकावरील उस्मान ख्वाजाही (13) फार काळ टिकू शकला नाही. एकापाठोपाठ फलंदाज बाद होत असताना स्मिथने एकाकी खिंड लढवली.
ऑस्ट्रेलियाची 8 बाद 122 धावा अशी अवस्था असताना स्मिथने लक्ष विचलित होऊ न देता पीटर सिडलच्या (44) साथीने नवव्या गड्यासाठी 88 धावांची भागीदारी रचली. सिडल बाद झाल्यानंतर स्मिथने आक्रमक पवित्रा अवलंबला. अकराव्या क्रमांकावरील नॅथन लिऑनसह त्याने दहाव्या गड्यासाठी 74 धावांची भागीदारी रचली. बेन स्टोक्सला कव्हरच्या दिशेने चौकार लगावून स्मिथने कारकीर्दीतील 24वे शतक साकारले.
ब्रॉडने स्मिथला 144 धावांवर बाद करून पाच बळी मिळवले आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 284 धावांत गुंडाळला. वोक्सने तीन, तर स्टोक्स व मोईन अलीने प्रत्येकी एक बळी मिळवला. दिवसअखेर इंग्लंडने पहिल्या डावात दोन षटकांत बिनबाद 10 धावा केल्या. जेसन रॉय 6 आणि रॉरी बर्न्सल 4 धावांवर खेळत होते.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : 80.4 षटकांत सर्वबाद 284 (स्टीव्ह स्मिथ 144, पीटर सिडल 44; स्टुअर्ट ब्रॉड 5/86). इंग्लंड (पहिला डाव) : 2 षटकांत बिनबाद 10.