Breaking News

तेलगू टायटन्सच्या पराभवाची हॅट्ट्रिक

इंदूर : वृत्तसंस्था

प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात तेलगू टायटन्सच्या पराभवाची मालिका सुरूच आहे. घरच्या मैदानावर खेळत असताना तेलगू टायटन्सने बुधवारी (दि. 24) आपल्या पराभवाची हॅट्ट्रिक नोंदवली. अखेरच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या सामन्यात दबंग दिल्ली संघाने तेलगू टायटन्सवर 34-33 अशा एका गुणाच्या फरकाने मात केली. कोल्हापूरच्या सूरज आणि सिद्धार्थ देसाई या बंधूंनी या सामन्यात तेलगू टायटन्सकडून प्रयत्नांची शर्थ केली, मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले.

पहिल्या सत्रापासूनच या दोन्ही संघांमधला सामना अटीतटीचा सुरू होता. उभय संघ एकमेकांना मोठी आघाडी घेऊ देत नव्हते. सूरज देसाईने पहिल्या सत्रापासूनच चढाईमध्ये आपली चमक दाखवत संघाला गुण मिळवून दिले, मात्र बचावफळीतल्या खेळाडूंच्या क्षुल्लक चुकांमुळे तेलगूच्या संघाने अनेक संधी दवडल्या. दुसर्‍या बाजूला दिल्लीच्या खेळाडूंनी मोक्याच्या क्षणी बाजी मारत मध्यांतरापर्यंत 13-12 अशी आघाडी कायम ठेवली.

दबंग दिल्लीच्या खेळाडूंनी या सामन्यात चांगला खेळ केला. चढाईमध्ये नवीन कुमार आणि चंद्रन रणजीत यांनी महत्त्वाच्या गुणांची कमाई केली. डावा आणि उजव्या कोपर्‍यातील अनुभवी खेळाडूंच्या समन्वयाच्या जोरावर दिल्लीची बचावफळीही आश्वासक खेळली. नवीनने चढाईत 14, तर चंद्रन रणजीतने सहा गुणांची कमाई केली. सामन्याच्या अखेरच्या मिनिटापर्यंत रंगत कायम होती. अखेरच्या लढाईत तेलगू टायटन्सला बरोबरी साधण्यासाठी दोन गुणांची आवश्यकता होती, मात्र दिल्लीच्या बचावपटूंनी समजदारी दाखवत एक गुण बहाल करीत सामन्यात विजय मिळविणे पसंत केले.

सूरजने या सामन्यात चढाईमध्ये 18 गुणांची कमाई करून सर्वाधिक गुण मिळवण्याचा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे त्याने भाऊ सिद्धार्थ देसाईचा 15 गुणांचा विक्रम मोडीत काढला.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply