मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा मंगळवारी (दि. 15) प्रकाशित केला. ’संपन्न, समृद्ध, समर्थ महाराष्ट्राचे संकल्पपत्र’ या शीर्षकाखाली भाजपने निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रकाशित केला असून, यात दुष्काळमुक्ती, रोजगारनिर्मिती, प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी आणि पायाभूत सुविधांवर भर देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी सांगितले.
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भाजपने संकल्पपत्र प्रकाशित केले. संकल्पपत्र प्रकाशनाच्या वेळी गुरू ठाकूर लिखित आणि अवधूत गुप्ते यांनी गायलेले ’पुन्हा आणू या आपलं सरकार’ हे प्रचार गीत लाँच करण्यात आले.
रोजगारनिर्मिती, नदीजोड प्रकल्प, ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था, वीजपुरवठा, शिक्षण, आर्थिक विकास, आरोग्य, शेती, जनसामान्यांचे कल्याण, विमान वाहतूक, बंदर विकास-जलवाहतूक, सिंचन-पाणीपुरवठा, ग्रामविकास, रेल्वे विकास अशा विविध विषयांवर जाहीरनाम्यातून घोषणा करण्यात आली आहे.
राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी 620 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, असेही संकल्पपत्रात जाहीर करण्यात आले आहे.
विरोधकांचा चेहरा उघड : मुख्यमंत्री
या वेळी विरोधकांचा समाचार घेताना मुख्यमंत्री म्हणाले की, कलम 370वरून विरोधक टीका करीत आहेत, पण त्यांच्यांकडे मुद्देच उरले नाहीत. 15 वर्षे त्यांनी राज्य केले, मात्र ते सपशेल अपयशी ठरले. आता देश अखंडतेच्या बाजूने असताना त्याला विरोध करण्याचे काम काँग्रेस, राष्ट्रवादीने केले. त्यामुळे त्यांचा चेहरा जनतेसमोर उघडा पडला असून, हे जनतेपर्यंत पोहोचविणारच!
‘पीएमसी’च्या खातेदारांना दिलासा देणार
आचारसंहितेमुळे पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेदारांची समस्या सोडवण्यात अडचण आहे, पण सरकार स्थापन होताच यासंदर्भात अर्थमंत्र्यांना जाऊन भेटणार आहे. सरकारकडे असलेल्या सर्व अधिकारांचा वापर करून पीएमसी बँकेच्या खातेदारांना तातडीने दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले.
संकल्पपत्रातील ठळक मुद्दे
* दुष्काळमुक्ती (पश्चिम घाटातील पाणी मराठवाडा व
उत्तर महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाकडे वळवणार)
* मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून 11 धरणांना
जोडून मराठवाड्यात दुष्काळ निर्मूलन करणार
* एक कोटी रोजगार निर्मिती करणार
* एक कोटी लोकांना बचत गटाशी जोडणार
* पाच लाख कोटींची गुंतवणूक करणार
* रस्ते दुरुस्तीसाठी स्वतंत्र तंत्र अवगत करणार
* प्रत्येक घरात वीज आणि शुद्ध पाणी पुरविणार
* संपूर्ण राज्याला इंटरनेटशी जोडणार
* शिक्षण मूल्यांवर आधारित करणार
* सोशल सिक्युरिटीत कामगारांना आणणार
* शहिदांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन धोरण
* विस्थापितांचे योग्य पुनर्वसन धोरण
* शेतीसाठी दिवसा 12 तास वीजपुरवठा करणार
* सौरऊर्जेचा वापर करून प्रदूषण रोखणार