Breaking News

बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या

उरण : वार्ताहर

गणेशोत्सव आठवड्यावर येऊन ठेपला असल्याने शहरातील बाजारपेठा विविध वस्तूंनी फुलल्या आहेत. यामध्ये सजावटीच्या वस्तूंसह मखरांचा समावेश आहे.

‘विठू माऊली’ मालिकेत पांडुरंगाने वापरलेल्या दागिन्यांची डिझाईन, मुकूट याची मागणी बाजारपेठेत अधिक दिसून येते. गणेशोत्सवात फुलांचे भाव वाढत असल्याने कृत्रिम फुलांच्या माळा घेण्यास ग्राहक सरसावत आहेत, तर विद्युत रोषणाईच्या झगमगाटासाठी चायना माळांना यंदाही मागणी कायम आहे. बल्बच्या लोप लाइट, ड्रॉप लाइट, स्ट्रिप लाइट आदी प्रकारच्या माळा डेकोरेशनसाठी उपलब्ध आहेत. थर्माकोलवर बंदी असल्याने या वर्षी कापडी मखरांबरोबरच लाकडी मखरेही मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाली आहेत.

गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी शेला 50 ते 250 रुपये, कंठी 20 ते 2500 पर्यंत, पूजेचे सामान 100 ते 200 रुपये, तर अगरबत्त्या 10 ते 100 रुपये दराने विकल्या जात आहेत, असे विक्रेत्यांनी बोलताना सांगितले.

पर्यावरणपूरक मूर्तींची मागणी वाढली

यंदा जय मल्हार, लालबागचा राजा, छत्रपती शिवाजी महाराज, दगडूशेठ हलवाई अशा गणेशमूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याचप्रमाणे शाडूपासून बनवलेल्या मूर्ती, तसेच कागदापासून तयार केलेल्या बाप्पालाही मागणी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत इकोफ्रेंडली अर्थात पर्यावरणपूरक मूर्तींची मागणी यंदा 10 टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे प्रदूषणाला काही प्रमाणात आळा बसणार आहे.

Check Also

उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …

Leave a Reply