Breaking News

कर्जत बेलाच्यावाडीत बिबट्याचा धुमाकूळ

एक गाय, 12 शेळ्यांची शिकार; शेतकर्‍यांत भीती

कर्जत : बातमीदार

भीमाशंकर अभयारण्य परिसराला लागून असलेल्या बेलाचीवाडी (ता. कर्जत) बाहेर असलेल्या बेड्यात घुसून बिबट्याने गुरुवारी (दि. 25) एक दुभती गाय आणि 12 बकर्‍यांना आपले शिकार केले. त्यातील तीन बकर्‍या ओढून जंगलात नेल्या, तीन बकर्‍या जखमी असून, सहा बकर्‍या आणि एक गाय मृत आढळली आहे. दरम्यान, मानवी वस्तीत घुसलेल्या या बिबट्यामुळे आजूबाजूच्या गावातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कर्जत तालुक्यातील अंभेरपाडा ग्रामपंचायत हद्दीत बेलाचीवाडी ही आदिवासी वाडी आहे. तेथील अंभेरपाडा-बेलाचीवाडी रस्त्यावर प्रकाश चंद्रकांत पारधी यांचा जनावरे बांधण्याचा बेडा आहे. या बेड्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनावरे आहेत. पारधी हे बकर्‍यांची राखण करून त्यापासून मिळणार्‍या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाची गुजराण करतात. या गोठ्यात गायी आणि बैलदेखील आहेत. गुरुवारी रात्री पाहुण्यांसोबत जेवण करून प्रकाश पारधी नेहमीप्रमाणे बेड्यावर झोपायला जाणार होते, मात्र रात्री 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास बेड्यामध्ये घुसलेल्या बिबट्याने तेथे दोरीने बांधून ठेवलेल्या बकर्‍यांना आपले लक्ष्य केले. तेथील 12 बकर्‍यांची शिकार करतानाच एका दुभत्या गायीवरदेखील त्याने हल्ला चढविला. तेथून निघून जाताना बिबट्याने सोबत तीन बकर्‍या नेल्या आहेत. रात्री झोपण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार बघून प्रकाश पारधी घाबरून गेले. त्यांनी रात्री तेथे न थांबता आपल्या बेलाचीवाडीमधील घरी मुक्काम केला. सकाळी पोलीस पाटील त्र्यंबक आसवले, ग्रामस्थ बाळू हंबेरे, भाऊ तिटकारे यांच्यासह बेडा गाठला आणि तेथे बांधून ठेवलेल्या अन्य जनावरांची सुटका केली. त्या वेळी वनपाल भाऊ आढे आणि महिला सरपंच यांचे पती वसंत तुंगे हे तेथे पोहचले.

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तीन बकर्‍यांना तत्काळ कशेळे येथील पशू वैद्यकीय दवाखान्यात पाठवून देण्यात आले. बकर्‍यांच्या मानेला चावा घेऊन बिबट्याने त्यांना मारले असल्याचे दिसून आले. गायीलादेखील त्याच प्रकारे ठार केल्याची माहिती वनपाल आढे यांनी दिली. या घटनेत शेतकरी प्रकाश पारधी यांचे किमान 50 हजारांचे नुकसान झाले असून, वन विभागाकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply