नवी मुंंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई काँग्रेसच्या वतीने इंधन व गॅसवाढीच्या निषेधार्थ गुरुवारी पालिका मुख्यालय ते कोकणभवन सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत नवी मुंबईतील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र रॅलीत आंदोलकांनी परवानगीपेक्षा जास्त सायकली वापरल्याने पोलिसांनी कारवाई करीत सायकली जप्त केल्या. तसेच कोरोना नियमांची पायमल्ली केल्याने आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रॅलीसाठी फक्त दहा सायकलींना परवानगी देण्यात आली होती. मात्र आंदोलकांनी यापेक्षा अधिक सायकलींचा वापर करण्यात आला. पोलिसांनी 35पेक्षा अधिक सायकली जप्त केल्या. काँग्रेसने महागाईसारख्या गंभीर विषयावर आंदोलन केले असले तरी त्यात गांभीर्य दिसत नव्हते. आंदोलक सायकल आणि नेत्यांसोबत सेल्फी काढण्यातच मग्न दिसत होते. तसेच सामाजिक अंतर व मुखपट्टीचा काहींना विसर पडला होता. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर संसर्गजन्य रोग प्रतिबंधित कायदा व बेकायदा आंदोलनप्रकरणी गुन्हे दाखल केले असल्याची माहिती एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली.