Breaking News

सावधान-एक अद्भुत कहानी चित्रपट प्रदर्शित

पनवेल ः वार्ताहर

एनएसजी निर्मिती असलेला सावधान एक अदभुत कहानी हा हॉरर चित्रपट आज शुक्रवारी (दि. 26) ओरियन मॉल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शित झाला. यानिमित्ताने पनवेल ओरियन मॉल येथे विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमास उपस्थित असणार्‍यासाठी एक शो ठेवण्यात आला होता. तालुक्यातील एका स्थानिक निर्मात्याने नवेदित मराठी कलाकारांना या सिनेमामध्ये संधी दिली आहे. या सिनेमाला दिग्दर्शक संदीप मिश्रा व अकील हैदर यांनी दिग्दर्शीत केले आहे. सिनेमामध्ये सुरुवातीलाच सावधान या गाण्याने प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः शहारे आणले. माणूस आज माणुसकी विसरून पैसा, संपत्ती यांच्यामागे धावत असून जल, जमीन व जोरू यांच्यापासून मनुष्याने जितके दूर राहता येईल, तितके राहावे व नेहमीच सावधान राहावे, असा संदेश दिला आहे. सिनेमामध्ये स्थानिक कलाकार असल्याने व स्थानिक ठिकाणांची अनेक दृश्य चित्रित केल्याने सिनेमा अधिक उठावदार झाला आहे. यामध्ये एका राजाची कहाणी दाखवली असून एका साधूला राजाच्या पित्याने दान म्हणून काही जमीन दिलेली असते मात्र राजाच्या पित्याचे निधन झाल्यानंतर त्या जमिनीवर राजा एक मोठी हवेली बांधतो. त्यानंतर काय होते हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. एका स्थानिक निर्मात्याने चित्रपट बनवणे खरोखरच खूप आनंदाची गोष्ट असून यामध्ये अनेक भयावह दृश्य चित्रित केली गेली आहेत. काही गाणी यामध्ये असल्याने चित्रपट अधिक चांगला झाला आहे. यावेळी चित्रपटामध्ये नायक सलील गायकवाड, ख़ुशी राणे, हेमंत बिर्जे, रमेश गोयल, अशान खान, नन्हे सूर्या, जावेद हैदर, राजू, रितू पांडे, अजिता सिंग, सुनील तिवारी, समीर आदी कलाकारांनी मेहनत घेऊन काम केले आहे. या कार्यक्रमास निर्माता निळकंठ गायकवाड, संगीता गायकवाड, रिटघरचे सुभाषशेठ भोपी, भारत भोपी, नितीन जोशी, संगीता जोशी, मुनीर तांबोळी, अल्ताफ शेख तसेच सिनेमाची टीम, मान्यवर व प्रेक्षक उपस्थित होते.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply