पेण : प्रतिनिधी – पेण पूर्व भागातील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून ते जीवाचे रान करून मोठ्या विजयाची आघाडी प्राप्त करून देतील, असा मला ठाम विश्वास आहे, असा दावा माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी सावरसई (ता. पेण) येथे केला.
सावरसई येथील श्री कृपा फार्म हाऊस येथे भाजपच्या पेण पूर्व भागातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक झाली. बैठकीत रविशेठ पाटील उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते.
सबका साथ सबका विकास, हे भाजपचे घोषवाक्य विचारात घेऊन केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपला मतदान करून आपला विकास साधू या, असे आवाहन करुन रविशेठ पाटील यांनी कार्यकर्त्याचे मनोबल वाढविले.
युवा नेते वैकुंठ पाटील, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, बाळगंगा संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील, अॅड. विकास म्हात्रे, जांभळे सर, दादरचे माजी सरपंच मोहन नाईक, तरणखोप सरपंच अभिजित पाटील आणि अमोद मुंडे यांच्यासह 500 कार्यकर्ते उपस्थित होते. पेण पूर्व विभागाला विकासाचा सुवर्णकाळ गाठायचा असेल तर भाजपला मतदान करून आपले नेते रविशेठ पाटील यांनाच निवडून आणावे लागेल, असा सूर या बैठकीत कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.