चंद्रकांत पाटील यांचा घणाघात; घराणेशाही नव्या पिढीला अमान्य
कोल्हापूर : प्रतिनिधी
गेल्या 25 वर्षांत 200-250 घराण्यांनी महाराष्ट्र लुटला आहे. साखर कारखाने मोडून खाल्ले आहेत. त्यांची चौकशी करणार असल्याचा घणाघात महसूलमंत्री आणि भाजप प्रदेध्याध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि. 28) येथे केला. माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांच्या भाजप प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.
महसूलमंत्री पाटील म्हणाले की, महाराष्ट्रानेच नव्हे तर देशानेही नवे राजकीय वळण घेतले आहे. आतापर्यंत नेहरू-गांधी घराण्याने देश चालवला आणि शरद पवार यांच्यासारख्यांनी महाराष्ट्र चालवला. पवार खासदार, मुलगी खासदार, पुतण्या माजी मंत्री आणि आता रोहित पवार विधानसभा लढवणार ही घराणेशाही नव्या पिढीला मान्य नाही. म्हणून लोक मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. आम्ही ज्यांना पक्षात घेत आहोत, त्यांना कोणतीही भीती दाखवण्याची गरज नाही. ते लोक स्वखुषीने भाजपमध्ये येत आहेत. आयकर धाडी किंवा ईडीचे छापे काय आठ दिवसांत टाकता येत नाहीत. त्यासाठी त्या यंत्रणा सहा-सहा महिने त्या प्रकरणाचा अभ्यास करीत असतात. त्यामुळे पवार किंवा हसन मुश्रीफ नुसता कांगावा करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना या कारवाईबद्दल हरकत असेल तर न्यायालयात दाद मागावी. आम्ही काय कुणाला अडवलेले नाही.
दोन्ही काँग्रेसमधील 200-250 घराण्यांनी महाराष्ट्र लुटून नेल्याने मागच्या पाच वर्षांत आमचे सरकार हतबल होते. आता आपल्याला मजबूत सरकार आणायचे आहे. त्यासाठी नेटाने कामाला लागावे, असे आवाहनही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, गेल्या 70 वर्षांत कमी अधिक प्रमाणात नेहरू कुटुंबातील व्यक्तीकडे सत्ता असावी, असा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तिकीट मिळवून दिले नाही. त्यांना पराभूत केले. त्यांना लोकसभेत बोलू दिले नाही. सरदार वल्लभभाई पटेलांना पुढे येऊ दिले नाही. काँग्रेसची हीच पद्धत पवारांनी कमी अधिक प्रमाणात राज्यात राबवली, असा आरोप त्यांनी केला. पवार आपल्या मुलीला बारामतीत तिकीट देतात. पार्थ पवारांना लोकसभा निवडणुकीत मावळमध्ये तिकीट दिले. आता दुसरा नातू विधानसभा निवडणुकीत उभा राहणार आहे. घराणेशाहीमुळे सामान्यांना तिकीट मिळत नसल्याने आज त्यांच्या पक्षातील लोक फुटून बाहेर पडत आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून 200 ते 250 घराण्यांनी सत्ता चालवली, असा आरोप त्यांनी केला. ही घराणी पवारांनी विकसित केली आहेत, असा दावा करीत या घराण्यातील व्यक्ती खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, कारखान्यांचे अध्यक्ष होतात. एक कारखाना बंद पाडायचा आणि दुसरा कमी किमतीत विकायचा असे व्यवहार केले असून, या घराण्यांनी महाराष्ट्र लुटला आहे. या सर्वांचे हिशेब आता चुकते करायचे असून, त्यांची सुटका नाही, असा इशाराही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या वेळी दिला.