Breaking News

पाऊस आला मोठा, पैसा झाला खोटा

यंदा जून महिना संपत आला तरी पाऊस न आल्याने (विश्वकप स्पर्धेसाठी साहेबाच्या देशात गेला होता, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.) पाणीटंचाई आणि उन्हाळ्यामुळे हवालदिल झाल्यावर सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, असे म्हणण्याची वेळ आपल्यावर आली होती. पावसाला बोलावण्यासाठी या वेळी अनेकांनी आपल्या लहानपणीचे येरे येरे पावसा तुला देतो पैसा, पाऊस आला मोठा पैसा झाला खोटा, हे गाणे म्हटल्याचे समजते. आपल्या मुख्यमंत्री देवेंद्रजींनीही पावसासाठी पंढरीच्या विठोबाला साकडे घातले. त्यानंतरही पावसाने राज्यात लपाछपीचा खेळ सुरू ठेवला.

पण या शुक्रवार आणि शनिवारी मात्र त्याने असा धुमाकूळ घातला की पाऊस आला मोठा पैसा झाला खोटा हे खरे ठरले. (बहुतेक विश्वचषक स्पर्धेत त्याला मिळालेल्या यशाची धुंदी अजून उतरली नसेल.) या पावसाने राज्यात अनेक ठिकाणी पूर आले. अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली. रस्त्यावर पाणी साचल्याने रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रेन आणि विमानाचे मार्ग बदलावे लागले. आलिशान वाहने रस्त्यात अडकून पडली. खिशात पैसे असूनही अनेक श्रीमंतांना सामाजिक संस्थांनी दिलेली बिस्किटे किंवा खिचडी खावी लागली. श्रीमंत ललना ज्यांच्याकडे पाहून नाक मुरडत त्यांचा हात धरून पाण्यातून बाहेर पडताना दिसत होत्या. हा सगळा बदल त्याने घडवून आणला होता. येरे येरे पावसा तुला देतो पैसा म्हटल्यावर तो मोठा आला आणि त्याने पैसा खोटा ठरवला.   

या पावसामुळे शुक्रवारी महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूरजवळ रात्री अडकून पडली. रेल्वेने याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला उशिरा दिल्याने 1100 प्रवाशांना रात्र गाडीत विंचू, साप यांच्या सोबतीने काढावी लागली. गाडीत पेंट्रीकार नसल्याने त्यांचे खाण्याचेही हाल झाले. शनिवारी दुपारी त्यांना बाहेर काढण्यास सुरुवात झाली. प्रवाशांना पाण्यातून बाहेर आल्यावर अवघड डोंगर चढून यावे लागले. या सगळ्यांमागचे कारण एकच खोटा झालेला पैसा असे त्याला आपल्याला सांगायचे असेल. बिल्डरांनी अनधिकृत बांधकामांना संरक्षण मिळवण्यासाठी अधिकार्‍यांना दिलेला खोटा (काळा) पैसा. त्यामुळे पाणी वाहून जाण्याचे नैसर्गिक स्त्रोत बुजवून त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिलेली दिसतात. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. आपण बोलावलेल्या पावसाला याचा राग आला असावा. नाहीतर तुम्ही लहानपणी  येरे येरे पावसा तुला देतो पैसा म्हटल्यावर आलेल्या मोठ्या पावसाच्या पाण्यात  सोडलेल्या कागदाच्या होड्याही व्यवस्थित जायच्या. आज पैसाच खोटा झाल्याने कागदी होड्यांऐवजी गाड्या आणि  बिल्डिंग जाताना आपल्याला दिसतात.

आपल्या नवीन पनवेलमधील सेक्टर 15मध्ये असलेल्या पी-6मध्ये पाऊस आल्यावर लगेच पाणी साचते. रस्ता बंद होतो. हे पाणी काढण्यासाठी आंध्रा बँकेसमोर सिडकोने पंप बसवला आहे. मुख्य रस्त्यापासून हा भाग खाली असल्याने येथील साचलेले पाणी पंपाने खेचून गटारात टाकले जाते. या पंपाने खेचलेले पाणी बंद गटाराच्या झाकणावर टाकले जाते.

-नितीन देशमुख, फेरफटका

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply