Breaking News

पंतप्रधान मोदींचे जय किसान!

महाराष्ट्रातील सर्व शेतकर्‍यांना किसान सम्मान योजनेचा लाभ देणार

नाशिक, नंदूरबार : प्रतिनिधी

भाजप पुन्हा सत्तेत आल्यावर महाराष्ट्रातील सर्व शेतकर्‍यांना किसान सम्मान योजनेचा लाभ दिला जाईल. त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेली किमान पाच एकर जमिनीची अट रद्द केली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 22) नाशिकच्या पिंपळगाव येथे केली; तर नंदुरबारमधील सभेत बोलताना आदिवासींच्या जमिनीला, तसेच आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असे आश्वासन दिले.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आधी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथे महायुतीचे नाशिक आणि दिंडोरीतील उमेदवार अनुक्रमे हेमंत गोडसे आणि भारती पवार यांच्या प्रचारार्थ आणि नंतर नंदुरबारमध्ये तेथील महायुतीच्या उमेदवार डॉ. हीना गावित आणि धुळे मतदारसंघाचे उमेदवार तथा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.

या सभांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, आमदार शिरीष चौधरी, डॉ. विजयकुमार गावित, आमदार उदेसिंग पाडवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल येईल, त्या वेळी मोदी सरकार सत्तेत आले, तर त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व शेतकर्‍यांना किसान सम्मान योजनेची मदत दिली जाईल. त्यासाठी किमान पाच एकर जमिनीचा नियम हटवला जाईल.

रोजगाराच्या प्रश्नावर बोलताना पंतप्रधान मोदींनी सांगितले की, मल्टी लॉजिस्टीक पार्क बनवले जाणार आहेत. यामुळे व्यापाराला चालना व तरुणांना रोजगार मिळेल. समाजातील प्रत्येक घटकासाठी आम्ही काही ना काही केलेय, असेही त्यांनी नमूद केले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply