उरण ः प्रतिनिधी
उरणमधील अनेक व्यक्ती विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. अनेकांनी उंच गरुडभरारी घेतली आहे. त्यापैकीच एक असलेल्या जसखार गावातील प्रणाली अशोक मढवी हिने आपल्या मेहनतीच्या व अभ्यासाच्या जोरावर संशोधनात चांगले कार्य केल्याने तिची निवड जपान या देशातील 5-जी कंपनीमध्ये शास्त्रज्ञ म्हणून झाली आहे.
प्रणाली मढवीचे शालेय शिक्षण उरणमधील आयईएस जेएनपीटी विद्यालयात झाले आहे. पुढे इंजिनिअरिंगचे शिक्षण मुंबई विद्यापीठ अंतर्गत असलेल्या विद्यालंकार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडाळा, दादर येथील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन या विषयात विशेष प्रविण्यासह पूर्ण केले. नोकरीच्या अनेक संधी असूनही तिने पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. वेल्लोर येथील वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून तिने एमटेकचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नवी मुंबईमधील रिलायन्स या कंपनीमध्ये दोन वर्षे नोकरी करून 4-जी या मोबाइल विभागात संशोधन केले. या केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आता जपानमधील रकुटेन मोबाइल नेटवर्क, टोकियो, डेटा सायन्स फॉर 5-जी ऑटोमेशन कंपनीमध्ये तिची वर्णी लागली आहे. पगाराचे पॅकेज महत्त्वाचे नसून ही संशोधनाची एक उत्तम संधी आपल्याला लाभली असल्याचे तिचे म्हणणे आहे. वार्षिक 45 लाख रुपये पॅकेज मिळणे सहज शक्य होत नाही, पण प्रणालीने तिच्या जिद्दीच्या जोरावर हे करून दाखविले.