Breaking News

गणेशोत्सवासाठी साहित्य खरेदीची पेण बाजारपेठेत लगबग

पेण : प्रतिनिधी

गणेशाचे आगमन चार दिवसांवर आले असून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लागणार्‍या साहित्य खरेदीसाठी भाविकांनी पेण बाजारपेठेत गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

रायगड जिल्ह्यातील प्रमुख शहरे आणि आठवडा बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवासाठी लागणार्‍या डेकोरेशन साहित्य खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. प्लास्टिक आणि थर्माकोल बंदीमुळे पेणची बाजारपेठ इकोफ्रेंडली साहित्यांनी सजली आहे. गणरायाच्या स्थापनेसाठी  वैविध्यपूर्ण मखर यंदा बाजारपेठेत विक्रीसाठी आली आहेत.

थर्माकोलची उणीव भासू नये म्हणून कलाकारांनी लाकूड, कागद आणि कापडापासून वैविध्यपूर्ण मखर बनवण्यास प्राधान्य दिले आहे. कागदी मखर, फुलांचे व कापडी मखर, तसेच लाकडाचे मखर, साईन बोर्ड यांचा यामध्ये समावेश आहे. मात्र या मखरांच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. यात कागदी पुठ्ठ्यांच्या मखरांचे दर सुमारे 700 पासून पाच हजार रुपयांपर्यंत आहेत. त्याचबरोबर लाकडी मखरांच्या किमती दोन हजार रुपयांपर्यंत आहेत.

सजावटीच्या अन्य वस्तूंनी बाजाराला शोभा आली आहे. यात फुलांच्या माळा, रंगीत कापड, झालर, मण्यांची तोरणे उपलब्ध आहेत. कृत्रिम फुलांचे दर 1200 रुपये तर कापडी फुलांचे दर 1500 पासून पाच हजार रुपयांपर्यंत आहेत. यंदा लाकडावर कोरीव काम करून पॉलीश केलेली मखर खास आकर्षण ठरत आहेत. हे मखर केवळ दोन आकारात उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती तीन ते सहा हजार रुपयांपर्यंत आहेत. लाकडी मखराला अधिक पसंती मिळत आहे. काही मखर मागणीनुसार तयार करून ठेवली आहेत, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. आतून पुठ्ठा आणि सजावटीकरिता वेगवेगळ्या रंगांचे कार्डबोर्ड, कार्डपेपर वापरूनही काही मखर तयार करण्यात आले आहेत. त्यावर विविध प्रकारच्या लेस, मणी लावून सजावट करण्यात आली आहेत. हे मखर दोन ते आठ हजार रुपयांना विकली जात आहेत. कापडी सजावट करून तयार केलेले मखर दोन्ही पर्यायांपेक्षा महाग आहे. हे मखर किमान पाच हजार ते जास्तीत जास्त 15 हजार रुपयांना उपलब्ध आहेत.

Check Also

पनवेल-उरणच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा मुंबई : रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत पनवेल व …

Leave a Reply