Breaking News

उमरोली येथे वाहून आले रेल्वेचे स्लीपर आणि खडी

कर्जत : बातमीदार

मध्यरेल्वेच्या कल्याण-कर्जत मार्गाच्या बाजूला असलेल्या उमरोली गावातील शेतकर्‍यांच्या शेतात पावसाच्या पाण्याबरोबर रेल्वेचे स्लीपर वाहून आले असून, रेल्वे मार्गाची खडीदेखील मोठ्या प्रमाणात आली आहे. दरम्यान, महसूल विभागाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

कर्जत तालुक्यातील उमरोली गावातील शेतकरी हिरू बुंधाटे आणि सुरेश बुंधाटे यांची भातशेती गारपोली गावाजवळ आहे. त्यांच्या शेत जमिनीच्या बाजूने मध्य रेल्वेची मार्गिका जात असून खालच्या बाजूला असलेल्या शेताच्या बांधाच्याकडेने पावसाचे पाणी वाहून नेणारी मोरी आहे. त्या मोरीमधून मागील काही दिवसापासून पुराचे पाणी ओसंडून वाहत आहे. त्या पाण्यासोबत मध्य रेल्वेचे सिमेंट स्लीपर मोठ्या प्रमाणात वाहून आले आहेत. त्यासह रेल्वे मार्गाची खडी आणि माती मोठ्या प्रमाणात वाहून आली आहे. त्यामुळे शेतीचे आणि शेत जमिनीचे नुकसान झाले आहे. एक एकर शेतात मातीचे थर दिसत आहेत. शेतात आलेले दगड आणि सिमेंटचे स्लीपर हे कसे काढायच, हा मोठा प्रश्न या शेतकर्‍यांपुढे निर्माण झाला आहे.

पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेल्या दगड व मातीने केलेल्या नुकसानीबद्दल शेतकरी बुंधाटे यांनी महसूल विभागाला कळविले. कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी त्याची तत्काळ दखल घेत तलाठी बापू सरगर यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा करून घेतला आहे.

उमरोली गावातील शेतकरी बुंधाटे यांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. पाणी वाहून नेणारी मोरी आणि शेतातील दगड याबाबत निर्णय घेऊन कार्यवाही करण्याची सूचना मध्यरेल्वे प्रशासनाला करण्यात येईल. -अविनाश कोष्टी, तहसिलदार

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply