Breaking News

चेन्नईची राजस्थानवर थरारक मात

जयपूर : वृत्तसंस्था

अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंह धोनी यांनी पाचव्या विकेटसाठी केलेल्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने राजस्थान रॉयल्सवर चार गडी राखून मात केली. मिचेल सॅन्टनरने षटकार ठोकून चेन्नईला राजस्थान रॉयल्सवर सनसनाटी विजय मिळवून दिला.

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात राजस्थानने चेन्नईला विजयासाठी 152 धावांचे आव्हान दिले होते. चेन्नईला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर तीन धावांची गरज असताना मिचेल सॅन्टनरने बेन स्टोक्सला विजयी षटकार ठोकून चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यात चेन्नईकडून कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 58 धावा, तर अंबाती रायुडूने 57 धावांची मोलाची खेळी केली. त्या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी रचली.

राजस्थानच्या सर्व गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. धवल कुलकर्णीने पहिल्याच षटकात शेन वॉटसनचा त्रिफळा उडवत राजस्थानला पहिले यश मिळवून दिले. यानंतर फाफ डु प्लेसिस, सुरेश रैना, केदार जाधव हे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतल्यामुळे चेन्नईचा संघ अडचणीत सापडला होता, मात्र यानंतर अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंह धोनी यांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. अखेरच्या षटकांत रायुडू-धोनी माघारी परतल्यामुळे सामना दोलायमान झाला होता. त्यातच पंचांनी दिलेल्या निर्णयामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, पण अखेरीस चेन्नईच्या तळातल्या फलंदाजांनी विजयासाठीचे आव्हान पूर्ण करीत राजस्थानवर मात केली. राजस्थानकडून धवल कुलकर्णी, बेन स्टोक्स, जयदेव उनाडकट, जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला, तर चेन्नईचा एक फलंदाज धावबाद झाला.

त्याआधी, गोलंदाजांनी भेदक मारा केल्याने चेन्नईने यजमान राजस्थानला 151 धावांवर रोखण्यात यश मिळवले. अजिंक्य रहाणे आणि जोस बटलर जोडीने राजस्थानला आश्वासक सुरुवात करून दिली, मात्र दीपक चहरने रहाणेला माघारी धाडत राजस्थानला पहिला धक्का दिला. यानंतर राजस्थानच्या डावाला गळतीच लागली. चहर, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा आणि मिचेल सँटनर यांनी ठराविक अंतराने राजस्थानच्या प्रमुख फलंदाजांना माघारी धाडणे सुरू ठेवले. संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी, स्टिव्ह स्मिथ यांच्याकडून राजस्थानला अपेक्षा होत्या, मात्र ते सपशेल अपयशी ठरले. यानंतर बेन स्टोक्सने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र दीपक चहरने त्याचा त्रिफळा उडवला. अखेरच्या षटकात श्रेयस गोपाळ आणि जोफ्रा आर्चर जोडीने फटकेबाजी करीत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. चेन्नईकडून चहर, जडेजा आणि ठाकूर या त्रिकुटाने प्रत्येकी दोन बळी टिपले. त्यांना सँटनरने एक गडी बाद करून साथ दिली.

या विजयासोबत चेन्नईने गुणतालिकेतील आपले पहिले स्थान कायम राखले आहे. दुसरीकडे राजस्थानची पराभवाची मालिका सुरूच असून चेन्नईकडून झालेल्या पराभवानंतर राजस्थानचा संघ सातव्या क्रमांकावर राहिला आहे. या पराभवामुळे राजस्थानचा पुढील फेरीत जाण्याचा मार्ग आणखी खडतर झाला आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply