Breaking News

टायगर जिंदा है!

1973 साली देशात व्याघ्र प्रकल्पाची सुरूवात झाली तेव्हा देशभरात अवघे नऊ व्याघ्र संवर्धन प्रकल्प होते. आता ही संख्या 50 वर पोहोचली आहे ही निश्चितच आनंदाची बाब आहे. एकंदर 72 हजार 749 चौ. किमीचे क्षेत्र या प्रकल्पांअंतर्गत येते. 2014 मधील 2226 वाघांवरून भारतातील वाघांची संख्या 2018 मध्ये 2967 वर पोहोचली आहे.

सेंट पीट्सबर्ग येथे नऊ वर्षांपूर्वी झालेल्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र परिषदेत वाघांची संख्या 2022 पर्यंत दुप्पट करण्याचे अद्दिष्ट सर्व देशांनी निश्चित केले होते. भारताने हे लक्ष्य चार वर्षे आधीच गाठल्याने पर्यावरण जगतात आनंदाची एक लहर उमटली आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त राजधानी दिल्लीत व्याघ्रगणनेचा 2018चा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जाहीर केला. काही वर्षांपूर्वी वाघांच्या वेगाने कमी होत चाललेल्या संख्येमुळे पर्यावरण तज्ज्ञांमध्ये आत्यंतिक चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. वाघ हा पर्यावरण संवर्धनाच्या केंद्रस्थानी मानला जातो. पर्यावरणाचा एकंदर समतोल हा वाघांच्या संख्येवर अवलंबून असल्यामुळे वाघांच्या संख्येचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच देशातील वाघांची संख्या 33 टक्क्यांनी वाढल्याचा आनंद व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलीवुडपटांच्या शीर्षकांचा आधार घेतला. ‘एक था टायगर’ची भीती पोटात घेऊन सुरू झालेली ही गाथा आता ‘टायगर जिंदा है’पर्यंत पोहोचली आहे. तिची यशस्वी वाटचाल ही अशीच अखंडित सुरू राहिली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 2006 मध्ये आपण व्याघ्र गणनेला सुरूवात केल्यापासून देशातील वाघांची संख्या सातत्याने 6 टक्के दराने वाढते आहे. आजवर मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांची कामगिरी सर्वात उल्लेखनीय राहिली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य चौथ्या क्रमांकावर असून उत्तराखंड तिसर्‍या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील वाघांची संख्या देखील 2006 मधील 103 वरून 2018 मध्ये 312वर पोहोचली आहे. राज्यातील ही वाढ 202 टक्के इतकी आहे. 2014 साली राज्यातील वाघांची संख्या 190 इतकी होती, ती आता 312 वर पोहोचल्याचे मानले जाते आहे. गेल्या चार वर्षांत राज्यात वाघांच्या संख्येत 122ने वाढ झाली असावी असा अंदाज आहे. व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या समीपच्या गावांत राबवलेल्या धोरणांचा या यशात मोठा वाटा आहे. गावकर्‍यांचे अन्यत्र पुनर्वसन केल्यामुळे हे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. वनआघाडीवरील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या यासंदर्भातील अथक प्रयासांचे त्यांनी केलेले कौतुक उचित असेच आहे. वाघांच्या प्रजोत्पादनात वाढ झाल्याचे वाढलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते आणि ही पर्यावरणवाद्यांसाठी निश्चितच आनंदाची बातमी आहे. वाघांना सुरक्षित अधिवास उपलब्ध झाल्याची तसेच त्यांच्या भक्ष्यांचे उत्तम व्यवस्थापन झाल्याची ही पोचपावती आहे, असेही श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे आणि ते बरोबरच आहे. गावकर्‍यांचे जंगलांवर अवलंबून असलेले जीवनमान बदलण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवरून सुरू आहेत. यातून वाघांसाठी अधिक सुरक्षित अधिवास उपलब्ध होऊ शकेल. वन्यप्राण्यांच्या संचारक्षेत्रातील विकासकामे टाळल्यास त्यांच्याकरिता अधिकाधिक नैसर्गिक आणि सुरक्षित असे अधिवास क्षेत्र आपोआप निर्माण होते. या क्षेत्रासमीपच्या लोकांचे अन्यत्र पुनर्वसन केल्यावरच हे शक्य होते आणि आता संबंधित प्रयत्नांमुळेच मोठे यश मिळवणे शक्य झाले आहे.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply