Breaking News

रोहेकर लोकलच्या प्रतीक्षेत

जलद गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय

रोहे : प्रतिनिधी

कोकण रेल्वे मार्गावरील रोहे हे महत्त्वाचे व तालुक्याचे ठिकाण आहे. मध्य रेल्वेने या स्थानकापर्यंतच्या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण केले आहे. मात्र या रेल्वे मार्गावर अद्याप लोकल चालू करण्यात आली नाही. महत्त्वाचे म्हणजे रोहे स्थानकात जलद गाड्या थांबत नसल्याने प्रवाशांचा पुर्ण भार पॅसेंजर गाड्यांवर येत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे येथील प्रवासी प्रतीक्षेत आहेत.

मध्य रेल्वेचे शेवटचे स्थानक म्हणून रोहा रेल्वे स्थानकाची ओळख आहे. धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात काम करणार्‍या बाहेरील कामगारांची या परिसरात मोठी संख्या आहे. पर्यटकांना मुरूड व तळा येथे जाण्यासाठी रोहा हा जवळचा मार्ग आहे. सध्या कोलाड, सुतारवाडीसह स्थानिक पर्यटन बहरत आहे. सरकारी नोकरी निमित्ताने बाहेरुन आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची संख्या मोठी आहे. स्थानीक व्यवसायीकांना मुंबई बाजारपेठ जवळ आहे. या सार्‍या बाबींचा विचार केल्यास  प्रवास गतीमान करण्यासाठी लोकलची आवश्यकता आहे.

मध्य रेल्वेने रोह्यापर्यंतच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पुर्ण केले आहे. पुर्वी कोकण रेल्वे  मार्गावरील नियमीत पॅसेंजर व नेत्रावतीसह अन्य हंगामी गाड्या रोहे स्थानकात थांबत होत्या. मात्र कोरोनामुळे सर्वच गाड्या बंद करण्यात आल्या. आता कोरोनाची लाट ओसरल्याने रेल्वे वाहतूक व प्रवाशी दोन्ही पुर्व पदावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र रोहा येथे थांबत असलेल्या जलद गाड्यांचा थांबा बंद केल्याने येथील प्रवाशांचे गैरसोय होत आहे. पॅसेंजर गाड्या कोकणातून भरुन येत असल्याने रोह्यातील प्रवाशांना जागा मिळत नाही. रोहा-दिवा गाडी दोन्ही वेळा भरुन जात असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

पनवेल-रोहा या दरम्यान रसायनी, आपटा, पेण, नागोठणे व रोहा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकातून मोठ्या प्रमाणात प्रवाशी रेल्वेने प्रवास करीत असतात. यासह निडी, कासू, जिते व सोमाटणे या रेल्वे स्थानकातूनही प्रवाशी रेल्वेने प्रवास करत असतात. यासर्व बाबींचा विचार केल्यास या मार्गावरील प्रवाशांना लोकलची आवश्यकता आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने या मार्गावर लोकल सेवा चालू करावी, अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.

Check Also

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आमदार प्रशांत ठाकूर यांचे जोरदार समर्थन

विधीमंडळ सभागृहात जाहीर केला पाठिंबा मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात जबदस्तीने किंवा प्रलोभनाव्दारे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने …

Leave a Reply