Breaking News

पाऊस वार्याने श्रीवर्धनकरांना झोडपले

श्रीवर्धन ः प्रतिनिधी

सतत चार ते पाच दिवस सोसायट्याचे वादळी वारे व पावसाने श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांना अक्षरशः झोडपले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी पावसाचे प्रमाण हे फारच चांगले आहे. गेल्या वर्षी कमी पाऊस पडल्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाईशी सामना करावा लागला होता, परंतु या वर्षी पाऊस हा चांगला पडत असल्यामुळे पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होईल, अशी शक्यता नाही. श्रीवर्धन तालुक्यामध्ये सतत पाऊस पडत आहे. त्याचप्रमाणे पावसाच्या बरोबर सोसाट्याचे वादळी वारेसुद्धा वाहत आहेत. वादळी वार्‍याने कहरच केला आहे. समुद्राच्या ठिकाणच्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. वादळी वार्‍यामुळे काही ठिकाणी झाडेझुडपे तुटून पडल्याचे घटना घडत आहेत. नारळी-पोफळी व इतर झाडाचे नुकसान होत आहे. या वार्‍यामुळे समुद्रकिनार्‍यांच्या लोकांना आपला जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. समुद्राच्या किनारी मच्छीमाराने नौका या शाकारून ठेवलेल्या असतात. त्या नौकांना या वार्‍यामुळे नुकसान होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. श्रीवर्धन तालुक्यामध्ये काही ठिकाणी या वादळी वार्‍यामुळे काही प्रमाणामध्ये नुकसान सहन करावे लागले आहे. पावसाने केलेल्या हाहाकारामुळे श्रीवर्धनला जोडणार्‍या मार्गवर पाणी साचलेले दिसत होते.

खोपोलीत पावसाचा धुमाकूळ सुरूच

रेल्वे, रस्ते वाहतूक पूर्णपणे कोलमडली

खोपोली ः प्रतिनिधी

खोपोली-खालापूर परिसरात रविवारी (दि. 4) मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरूच राहिला. मुसळधार पावसामुळे खोपोली-कर्जत व मुंबई लोकल सेवा पूर्णपणे बंद राहिली. महामार्गावरही ठिकठिकाणी पाणी भरल्याने पनवेल-खोपोली, खोपोली-पाली, खोपोली-पेण वाहतूक पूर्ण विस्कळीत झाली. जुना महामार्ग व एक्स्प्रेस-वे ला जोडणार्‍या सावरोली पुलावर पाताळगंगा नदीचे पाणी चढले व हा पूल एका बाजूला खचल्याची अफवा पसरल्याने येथील वाहतूकही थांबविण्यात आली होती, तसेच नडोदे-वणी येथील डोंगर खचल्याने प्रशासन, आपत्कालीन यंत्रणा व नागरिकांची मोठी धावपळ उडाली. मागील आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शनिवारपासून उग्ररूप धारण केले, ते रविवारीही कायम राहिले. दोन दिवसांत खोपोली व खालापूर परिसरात रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला. या दमदार पावसाने येथील लोकल, रस्ते वाहतूक दैनंदिन सर्व व्यवहार पूर्णपणे विस्कळीत झाले. पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यात टाटा पॉवर कंपनी, कलोते व मोरबे धरणातूनही अतिरिक्त पाणी विसर्ग करण्यात आल्याने अनेक वर्षांनंतर सावरोली पुलावर नदीचे पाणी चढले. त्यात हा पूल खचल्याची अफवा पसरल्याने प्रशासन, पोलीस व आपत्कालीन यंत्रणेची तारांबळ उडाली. याबाबत माहिती होताच पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील व तालुका महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी पुलाची पाहणी केली, तसेच आयआरबीच्या तांत्रिक विभागाला संदेश देऊन पुलाची तपासणी करून अहवाल देण्याच्या सूचनाही दिल्या. महत्त्वाचे म्हणजे रविवारी सकाळपासून खोपोली-कर्जत व मुंबई लोकल सेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. सुदैवाने या पावसामुळे खोपोली व खालापुरात जीवितहानी व मोठ्या नुकसानीची नोंद नाही.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply