अलिबाग : प्रतिनिधी
अतिपावसामुळे रायगड जिल्ह्यात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 1116 गावांमधील 18 हजार 595 हेक्टर क्षेत्रावरील भात शेती, भाजीपाला, आंबा बागायतींचे नुकसान झाले आहे. सुमारे 20 टक्के कृषिक्षेत्र बाधित झाले आहे.
रायगड जिल्ह्यात एक लाख 23 हजार हेक्टर भात लागवडीचे क्षेत्र आहे. यापैकी यंदा एक लाख चार हजार हेक्टरवर भातलागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भात लावणीची कामे 100 टक्के पूर्ण झाली होती. चांगला पाऊस पडत असल्यामुळे रोपांची वाढ चांगली होत होती. कुठल्याही रोगाचा प्रदूर्भाव झाला नव्हता. यंदा चांगले उत्पादन मिळेल, अशी शेतकर्यांना अपेक्षा होती, मात्र जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापसून पावसाने रायगडला झोडपून काढले. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठड्यातच पावसाने आपली वार्षिक सरासरी ओलांडली. या अतिपावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे.
पाण्याचा निचरा न झाल्यामुळे खाचरांमध्ये पाणी साचून राहिले. काही ठिकाणी पाण्याच्या स्त्रोतामुळे जमीन खरडून गेली, बांध फुटले. उधाणाचे पाणी आले. शेतामध्ये माती भरली. दगडगोटे आले. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. अलिबाग तालुक्यात सार्वाधिक क्षेत्रात नुकसान झाले आहे.
अलिबाग तालुक्यात 132 गावांमधील पाच हजार 567 हेक्टर क्षेत्रावरील भात शेती व आंबा बागायतींचे नुकसान झाले आहे. पेण तालुक्यात 171 गावांध्ये चार हजार 281 हेक्टर क्षेत्रावरील भात शेती, भाजीपाला व आंबा बागायातीचे नुकसान झाले आहे. महाड तालुक्यात चार हजार 700 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. मुरूड तालुक्यात 152 हेक्टर, खालापूर तालुक्यात 148.50 हेक्टर, कर्जतमध्ये 179 हेक्टर, पनवेलमध्ये 154 हेक्टर, उरण 376 हेक्टर, माणगाव तालुक्यात 350 हेक्टर, तळा तालुक्यात 263 हेक्टर, रोहा 479 हेक्टर, पाली 4.20 हेक्टर, पोलादपूर तालुक्यात एक हजार 700 हेक्टर, म्हसळ्यामध्ये 48 हेक्टर, श्रीवर्धनमध्ये 1.50 हेक्टर क्षेत्र अतिपावसामुळे बाधित झाले आहे.
अतिपावसामुळे कृषिक्षेत्राचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकरी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. त्यानुसार पंचानामा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामात शेतकर्यांनी शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे.
-पांडुरंग शेळके,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी