महाड : प्रतिनिधी
अतिवृष्टी आणि पुरामुळे महाड आणि पोलादपूर तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी (दि. 8) महाड बाजारपेठेतील नुकसानीची पाहणी केली. पोलादपूर येथील कोतवाल रस्त्याचीही त्यांनी पाहणी केली. त्यानंतर प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या दालनात बैठक घेऊन, नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या.
मुसळधार पावसाने मागील काही दिवसांत महाड, पोलादपूर तालुक्यात हाहाकार माजला होता. त्यामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली होती. सावित्री, गांधारी व काळ नद्यांनी आक्राळविक्राळ रूप धारण केले होते. पुराचे पाणी महाड शहरासह काही गावात घुसले होते. त्यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी घरे, तर काही ठिकाणी दरडी कोसळल्या. बाजारपेठेत पुराचे पाणी घुसल्याने व्यापार्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आमदार प्रवीण दरेकर यांनी या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर प्रांताधिकार्यांच्या दालनात आढावा बैठक घेतली.
कोसळलेल्या घरांचे व नुकसान झालेल्या भातशेतीचे त्वरित पंचनामे करा, पूरबाधित गावात जेवण व निवार्याची व्यवस्था करा, तसेच कोतवाल रस्ता आणि भोर मार्गासाठी पर्यायी मार्ग सुरू करण्याच्या सूचना आमदार दरेकरांनी या वेळी केल्या.
या पुराने 500 जण बाधित झाले असून, पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी या बैठकीत सांगितले. महाड-भोर-पुणे रस्त्याला पर्याय असलेल्या मढे घाटाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, असे व्यापार्यांकडून सुचविणयात आले, तसेच पूर नियंत्रण समितीचे गठण, विद्युत डीप उंचावर घेणे, या विषयांवर चर्चा झाली.
दादली येथील जलवाहिनी वाहून गेल्यामुळे शहराच्या काही भागात सध्या पाणीपुरवठा होत नाही, अशी माहिती देऊन नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. या बैठकीला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पप्पू मुंदडा, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेय भोसले, सरचिटणीस बिपीन म्हामुणकर, तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, तहसीलदार चंद्रसेन पवार, संदीप ठोंबरे आदी उपस्थित होते.
पूर रेषेच्यावर पाणी आले आणि 48 तास पुराचे पाणी घरात राहिले असेल अशांनाच आर्थिक मदत मिळू शकते. त्यामुळे महाडमधील आपद्ग्रस्त मदतीपासून वंचित राहणार आहेत. मुख्यमंत्री साहेबांजवळ चर्चा करून महाडमधील आपद्ग्रस्तांना विषेश बाब म्हणून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
-प्रवीण दरेकर, आमदार