Thursday , March 23 2023
Breaking News

महाराष्ट्राच्या विजयात ऋतुराज चमकला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला आणि मुश्ताक अली ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या ई-गटात तिसर्‍या विजयाची नोंद केली.

हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 124 धावांचे आव्हान उभे केले. यात रोहित रायुडूने सर्वाधिक 47 धावा केल्या. त्याने 34 चेंडूंत एक चौकार आणि दोन षटकारांसह ही खेळी साकारली. बव्हानाका संदीप (25) सोबत त्याने चौथ्या गडयासाठी 47 धावांची भागीदारी केली. महाराष्ट्राच्या विशाल गीतेने 30 धावांत दोन बळी घेतले.

यानंतर सलामीवीर विजय झोल आठ धावांवर तंबूत परतल्यामुळे महाराष्ट्राची 1 बाद 18 अशी अवस्था झाली. मग ऋतुराजने दुसर्‍या गड्यासाठी कर्णधार राहुल त्रिपाठीसोबत 42 धावांची भागीदारी केली. मोहम्मद सिराजने त्रिपाठीचा (16) त्रिफळा उडवल्यानंतर ऋतुराजने नौशाद शेख (नाबाद 42) सोबत तिसर्‍या विकेटसाठी 43 धावांची उपयुक्त भागीदारी रचली. ऋतुराजने 40 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह 54 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

हैदराबाद : 20 षटकांत 6 बाद 124 (रोहित रायुडू 47; विशाल गीते 2/30) पराभूत वि. महाराष्ट्र : 18 षटकांत 3 बाद 125 (ऋतुराज गायकवाड 54, नौशाद शेख नाबाद 42; पलकोडेटी सायराम 2/38.)

Check Also

पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागताचा उत्साह

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित शोभायात्रेत लहान मुलांसह महिला, …

Leave a Reply