Breaking News

नांदगाव ग्रामपंचायतीने आवाज उठवताच पंचायत समितीला जाग

नदीपुलाची दुरुस्ती करण्याची दर्शविली तयारी

पनवेल : रामप्रहर वृत्त

अतिवृष्टीमुळे नांदगाव येथील नदीवरील पुलाची दुर्दशा झाली आहे. याबाबत नंदादेवी ग्रामविकास आघाडीच्या ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद, तसेच सिडकोकडे आवाज उठविल्यानंतर पनवेल पंचायत समितीला जाग आली असून, हे काम करण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे, मात्र याचे श्रेय ग्रामपंचायतीचेच असल्याचे नंदादेवी ग्रामविकास आघाडीने म्हटले आहे.

पनवेलहून निघाल्यावर भिंगारी गावाजवळ उजवीकडे वळून नांदगावला जाण्याचा रस्ता आहे. येथे नदी ओलांडण्यासाठी जिल्हा परिषदेने बांधलेला कल्व्हर्ट प्रकारचा अतिशय कमी उंचीचा पूल आहे. एरवी फक्त नांदगावातील नागरिकांसाठी वापरला जाणारा हा रस्ता महामार्गावरील कोंडीमुळे मोठ्या प्रमाणात वापरात आला आहे. सुरुवातीला स्थानिकांनी शोधलेल्या या मार्गाचा आता बाहेरील वाहनांनीदेखील वापर केला आहे. ओएनजीसी पुलाखाली पाणी साचले की अनेक वाहने या मार्गाने जातात. त्यामुळे आता या मार्गावरही कोंडी होऊ लागली आहे.

नांदगाव येथील काळुंद्री नदीवरील अरुंद व संरक्षक भिंत नसलेल्या या पुलावर जोरदार पाऊस व जास्त वर्दळीमुळे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना हे खड्डे चुकविताना मोठी कसरत करावी लागते. विशेष म्हणजे वाढलेल्या वाहनांमुळे पायी ये-जा करणार्‍या नागरिकांना अडचण होते. या पार्श्वभूमीवर पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडे केली होती, मात्र त्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे जि. प. उपअभियंता (बांधकाम) उपविभाग पनवेल यांनी कळविले, तसेच नांदगाव हे गाव सिडको प्रकल्पग्रस्त असून, नांदगाव-भिंगारी हा रस्ता सिडको हद्दीत येत असल्याचे या पत्रात नमूद होते. त्यानुसार ग्रामपंचायतीने याबाबत सिडकोचे लक्ष वेधले असता, त्यांनी पुलाची डागडुजी करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

अखेर धास्तावलेल्या शेकाप पुढार्‍यांनी शुक्रवारी (दि. 10) नांदगाव येथे भेट देऊन पुलाची पाहणी केली व पं. स.च्या माध्यमातून येत्या आठ दिवसांत हे काम करून देणार असल्याचे सांगितले, मात्र या कामाचे श्रेय केवळ नंदादेवी ग्रामविकास आघाडीच्या ग्रामपंचायतीचे असल्याचे सरपंच मनोहर भोईर, करंजाडे विभाग प्रमुख अविनाश हुद्दार, भाजप नांदगाव प्रमुख मिथुन पाटील, शाखाप्रमुख गणेश खुटले, माजी उपसरपंच रवींद्र फडके, पोलीस पाटील विजय खुटले, पवन खुटले, रवी खुटले, निखिल भोईर आणि ग्रामस्थांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

दरम्यान, 27 जुलै रोजी नांदगाव येथील पाईपलाईन पुरात वाहून गेली होती. नंदादेवी ग्रामविकास आघाडीच्या अधिपत्याखाली कार्यकर्ते व ग्रामस्थांनी रविवारी (दि. 11) एकत्र येऊन पाण्यात पडलेली पाईपलाईन काढून

सरपंचांनी स्वखर्चातून ती जोडून दिली. त्या वेळी पंचायत समिती व शेकाप पुढारी कुठे होते, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …

Leave a Reply