पनवेल : वार्ताहर
शहरासह तालुक्यात शुक्रवारी (दि. 4) माघी गणेश जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. माघी गणेशोत्सवानिमित्त सर्व गणपती मंदिरे सजली व भाविकांच्या गर्दीने पुन्हा एकदा गजबजून गेली होती.
पनवेल शहरातील कापड बाजार येथे असलेल्या ज्येष्ठराज गणेश मंदिरात माघी गणेशोत्सव भक्तिभावाने व श्रद्धेने साजरा झाला. तालुक्यातील कोपर गावातही स्वयंभू चिंतामणीचे पुरातन मंदिर असून या ठिकाणी जवळपास शंभर वर्षांची माघी गणेश जयंतीची परंपरा आहे. येथे भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताह, महाप्रसाद, पालखी सोहळा यासारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली.
बाप्पाच्या दर्शनासाठी शुक्रवारी सकाळपासूनच भाविकांनी रांगा लावल्या होत्या. मंदिर परिसरात फुलांची विशेष आरास करण्यात आली आहे. या वेळी कोपर गावचे माजी पोलीस पाटील नाथा पाटील, नागरिक चंद्रकांत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव सुरेश धुमाळ, कृती समितीचे खजिनदार संतोष पवार, ग्रामस्थ राजेश पाटील, जेष्ठ नागरिक जाना झुगे, ग्रामस्थ पंच कमिटी मंदिर कमिटीचे दयाळ पवार यांच्यासह आदी पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी 10 गाव अध्यक्ष नाथा पाटील यांनी कोपर गावच्या पुरातन गणेश मंदिराची माहिती देताना सांगितले की, 1932 साली आमच्या वाडवडिलांनी पत्र्याच्या गणेश मंदिराचे रूपांतर कौलारू मंदिरात केले. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी गाव एक गणपतीची प्रथा आहे. भाद्रपद महिन्यातदेखील गावात बाहेरून मूर्ती आणली जात नाही, तर गावातील स्वयंभू चिंतामणीचीच पूजा-अर्चा केली जाते आणि दीड दिवसाचा उत्सव साजरा केला जातो. 2018मध्ये इथल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाल्याने गाव स्थलांतरित झाले. त्यानंतर पुष्पकनगर येथे राहायला आल्यावर सेक्टर 4मध्ये गणेशाचे भव्य मंदिर उभारण्यात आले. या ठिकाणी दररोज पहाटे काकड आरती, सकाळी 7 वाजता ज्ञानेश्वरीचे पारायण करण्यात येते व चिंतामणी ग्रंथाची कथा सांगण्यात येते. त्यानंतर उपस्थित मंडळींना भोजन दिले जाते. दुपारी 3 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ज्ञानेश्वरीचे पारायण केले जाते. 5 ते 6 प्रवचन व प्रवचनानंतर हरिपाठ कार्यक्रम होतो. हरिपाठानंतर कीर्तनाचा कार्यक्रम असे दैनंदिन कार्यक्रम सुरूच असतात.
ग्रामीण भागातही श्रद्धा अन् उत्साह
पनवेल ः तालुक्याच्या ग्रामीण भागातही माघी गणेश जयंतीचा उत्साह दिसून आला. दिघाटी येथील श्रीगणेश मंदिरात माघी गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
नवतरुण गणेश मित्र मंडळातर्फे यंदाही तीन दिवस काकडा, हरिपाठ, कीर्तन, अभिषेक आदी झाले. शुक्रवार सकाळी 9.30 वा. साईचे माजी सरपंच अण्णाशेठ पाटील, दिघाटीचे सरपंच अमित पाटील, रमेश बाळाराम पाटील (वेश्वी) यांच्या हस्ते अभिषेक, सिकंदर म्हात्रे यांच्या हस्ते कलशपूजन, हसुराम पाटील यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. सकाळी 10.30 ह.भ.प ह.भ.प एकनाथ महाराज (कंठवली) यांचे श्रीगणेश जन्माचे कीर्तन झाले. या वेळी माजी उपसरपंच दत्तात्रेय पाटील, मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, बळीराम ठाकूर, कैलास पाटील, पुंडलिक पाटील, अर्जुन पाटील, अशोक पाटील, रामभाऊ पाटील, संदीप पाटील, गजानन पाटील, सिकंदर म्हात्रे, रवींद्र पाटील, नंदकुमार पाटील यांच्यासह भाविक उपस्थित होते. सायंकाळी बापूजी देव प्रासादिक भजन मंडळाचा हरिपाठ झाला. रात्री श्री गणेश प्रासादिक नवतरुण मंडळाचे भजन झाले व 10 वाजता श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. तीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper