नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
कोल्हापूर व सांगली येथे उद्भवलेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे पूरग्रस्तांसाठी मदतकार्य मिळावे म्हणून नवीन पनवेल येथील जय बजरंग मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ, ओम साई मित्र मंडळ, जिव्हाळा मित्र मंडळ, तसेच पनवेल महापालिकेच्या नगसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या आवाहनाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी नवीन पनवेलमधील विविध मंडळांच्या वतीने भरघोस प्रतिसाद देण्यात येत आहे. त्यांच्या वतीने जमविण्यात आलेले सामान मंगळवारी (दि. 13) सांगलीकडे रवाना झाले. मंडळातर्फे नवीन पनवेल येथील बांठिया हायस्कूलमध्ये सर्व अत्यावश्यक वस्तू तीन खोल्यांमध्ये ठेवण्यात आले होते. तांदूळ, तेल, साबण, सात हजार सॅनेटरी नॅपकिन, मास्क, कपडे, बिस्किटे, चिवडा, तांदूळ, गव्हाचे पीठ, साखर, चहा, पाणी, ब्लँकेट, औषधे इत्यादी जवळपास चार ते पाच लाखांच्या वस्तू मदत स्वरूपात नागरिकांनी जमा केल्या. या ठिकाणी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. पूरग्रस्त भागातील 500हून अधिक कुटुंबांना ही मदत दिली जाणार असल्याची माहिती पनवेल महापालिकेच्या नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांनी दिली.