क्वारंटाइन सेंटरमधील बलात्कारावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा सवाल
पनवेल : प्रतिनिधी
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी असलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका महिलेवर क्वारंटाइन असलेल्याच एका युवकाने बलात्कार केला ही दुर्दैवी आणि संतापजनक घटना असून, त्यामुळे कोरोनो सेंटरच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी आरोपीसोबतच येथील सुरक्षेची जबाबदारी असणारे रक्षक आणि प्रशासक यांचीसुद्धा चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. त्याचबरोबर राज्यात महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी राज्य सरकार दिशा कायदा कधी अंमलात आणणार, असा सवालही त्यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.
पनवेल तालुक्यातील कोन येथील इंडिया बुल क्वारंटाइन सेंटरमध्ये एका महिलेवर क्वारंटाइन असलेल्याच युवकाने बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकाराचा राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी शनिवारी (दि. 18) संबंधित क्वारंटाइन सेंटरला भेट दिली आणि या घटनेची माहिती घेऊन पीडित महिलेची विचारपूस केली. महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत आदी सोबत होते.
यानंतर पत्रकारांशी बोलताना भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, या ठिकाणी एक महिला कोरोनावर उपचार करायला आली असताना तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रसंग घडला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असला तरी महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यांच्यावर इथली सुरक्षेची जबाबदारी आहे ते इथले प्रशासन आहे. त्यांच्याकडून लाखो रुपयांचा निधी रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी वापरला जातो. मग असा एखादा माणूस अन्य मजल्यावरील महिलेच्या रूममध्ये जातो याची माहिती कोणाकडेच नाही. त्यामुळे आरोपीसोबत इथली सुरक्षेची जबाबदारी असणारे रक्षक आणि प्रशासकीय अधिकारी यांचीसुद्धा चौकशी व्हायला हवी तसेच त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक आहे.
राज्यातील क्वारंटाइन सेंटरमधील ही पहिलीच घटना नाही. अनेक ठिकाणी क्वारंटाइन सेंटरमध्ये महिलांचा व मुलींचा विनयभंग झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कोरोनाबरोबरची आपली लढाई लवकर संपणारी नाही. त्यामुळे आताच अशा आरोपींच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. राज्यात इतर ठिकाणी अशा घटना घडल्यास क्वारंटाइन सेंटरचे जे जबाबदार लोक असतील त्यांनादेखील जाब विचारला गेला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. कोरोनाग्रस्त महिला उपचारासाठी गेली असता, असा प्रसंग घडत असेल तर महिलांनी उपचारासाठी जायचे की घरातच उपचाराविना मरायचे याचेही उत्तर राज्य सरकारने दिले पाहिजे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
ज्या वेळेला अशा घटना होतात त्या वेळी विविध कायद्याांबत किंवा नवीन येणार्या कायद्यांबद्दल बोलले जाते. राज्यात महिलांचा लैंगिक छळ, हत्या यांसारख्या घटना वाढू लागल्या आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी दिशा कायदा अंमलात आणला जाईल, अशी घोषणा या राज्य सरकारने केली होती, मात्र अद्याप हा कायदा अस्तित्वात आलेला नाही. त्याचीच आम्ही वाट बघतो आहे, असा टोलाही वाघ यांनी लगावला.
दरम्यान, कोरोना संशयित व पॉझिटिव्ह महिलांसाठी येथे नेमकी काय व्यवस्था आहे याबाबतही भाजप नेत्यांनी जाणून घेतले. महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याच्या सूचना या वेळी प्रशासनाच्या प्रतिनिधींना देण्यात आल्या.
गृहमंत्र्यांनी जनतेची माफी मागावी -सोमय्या
राज्यातील कोविड सेंटर आणि हॉस्पिटलमधून पेशंट पळून गेल्याचे राज्याने पाहिले. त्यासोबत मृतदेह गायब झाल्याचेही आपण ऐकले आहे. आता पनवेलमध्ये एका महिलेवर बलात्काराची घटना घडली आहे. या घटनेसाठी राज्याच्या गृहमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी या वेळी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली.
आरोपी पोलिसांच्या नजरकैदेत
पनवेल : कोन येथील इंडिया बुल्स क्वारंटाइन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार करणारा आरोपी पनवेल तालुका पोलिसांच्या नजरकैदेत आहे. या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, त्याचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करून पोलीस त्याला ताब्यात घेणार आहेत. दरम्यान, आरोपीच्या रूमबाहेर पोलीस पहारा ठेवण्यात आला आहे. या बलात्कारप्रकरणी सहाय्यक निरीक्षक नितीन पगार अधिक तपास करीत आहेत.