पनवेल : वार्ताहर
तेलंगणा राज्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला पनवेलजवळील आदई गावात अमली पदार्थांचा साठा आढळला आहे. एका इमारतीमध्ये चार किलो 98 ग्रॅम वजनाचा व तीन कोटी 48 लाख रुपये किमतीचा मेथँक्युलोन हे ड्रग्ज पोलिसांनी हस्तगत केले असून या प्रकरणी बेन ओकोरोको व एका नायझेरियन महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तेलंगणामधील सायरागाद पोलीस ठाण्याचे पथक फसवणुकीच्या गुन्ह्यामधील आरोपींचा घेण्यासाठी पनवेलमध्ये आले होते. खांदेश्वर पोलिसांनी या पथकाला सहकार्य करीत आरोपीच्या शोधात आदईमधील शिवसाई इमारतीत प्रवेश केला. तेथील घराचा दरवाजा बंद असल्याने पोलिसांनी कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. तेव्हा घरात एका पिशवीमध्ये 68 लाख 25 हजार रुपये किमतीचे 975 ग्रॅम अमली पदार्थ व चार पिशव्यांमध्ये प्रत्येकी 70 लाख रुपये किमतीचे प्रत्येकी एक किलो एक ग्रॅम अमली पदार्थ आढळून आले.
दरम्यान, तळोजा जेल रोडवरून टाटा कॅन्सर हॉस्पिटलकडे जाणार्या रोडवर अमली पदार्थविरोधी पथकाने प्रिन्स ऑडवीन व अॅनी बेन्जामीन या दोन आफ्रिकन नागरिकांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून पाच लाख 78 हजार रुपये किमतीचा 56 ग्रॅम मेथॅक्युलोन हा अमली पदार्थ जप्त केला. त्यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …